सकाळ सन्मान सोहळा | उद्याच्या पिढीला मार्गदर्शन व्हावे यासाठी हा सत्कार महत्त्वाचा : प्रवीण दरेकर

सकाळ सन्मान सोहळा | उद्याच्या पिढीला मार्गदर्शन व्हावे यासाठी हा सत्कार महत्त्वाचा : प्रवीण दरेकर

मुंबई  - कोरोना काळात समाजासाठी योगदान देणाऱ्या सर्वसामान्य शवागार कर्मचाऱ्यापासून ते वरिष्ठ अधिकारी, महाराष्ट्राचे गृहमंत्री, आरोग्यमंत्री या अशा 31 सेवाव्रतींचा गौरव "सकाळ सन्मान-2021' या कार्यक्रमात झाला.

मुंबईतील प्रभादेवीच्या रवीद्र नाट्यमंदिरात शनिवारी (ता. 30) झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या सर्वांनीच या व पडद्यामागे काम करणाऱ्या अशाच असंख्य अनामवीर कोरोनायोद्‌ध्यांच्या परिश्रमांचा मुक्तकंठाने गौरव केला. तसेच या कोरोनायोद्‌ध्यांच्या सन्मानाच्या माध्यमातून असंख्य लोकांना प्रोत्साहन देणाऱ्या "सकाळ'च्या या प्रयत्नाचेही कौतुक केले. कोव्हिड योद्‌ध्यांचा सन्मान करणाऱ्या "सकाळ' माध्यमसमूहाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अभिनंदन केले.

मी स्वतः कोरोना काळात राज्यात फिरताना या सर्व अधिकाऱ्यांना भेटलो आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांशी सतत संपर्क ठेवला होता. त्यामुळे "सकाळ'ने या कोव्हिड योद्‌ध्यांचा केलेला सन्मान अत्यंत योग्य आहे, असे विरोधीपक्षनेता म्हणून माझे मत आहे. कोरोनायोद्धे पुष्कळ आहे, पण कोरोनासंकट दूर करण्यात सिंहाचा वाटा असलेल्यांचा हा प्रातिनिधिक सत्कार आहे. या योद्‌ध्यांच्या कामाच्या माध्यमातून उद्याच्या पिढीला मार्गदर्शन व्हावे यासाठी हा सत्कार महत्त्वाचा असल्याचे दरेकर यावेळी म्हणाले. 

हल्ली हळूहळू कमी होत असलेले संस्कार व सामाजिक बांधिलकी यांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महाराष्ट्राचा हा सामाजिक वारसा पुढे नेण्यासाठी "सकाळ'चा हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरेल, असेही दरेकर यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांमध्ये "सकाळ' समूहाचे वेगळे स्थान असून, पत्रकारितेप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करताना "सकाळ'ला साऱ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. मग तो किल्लारी भूकंप असो वा अन्य संकटे असोत, पण निधी संकलन वा अन्य प्रकल्पांच्या माध्यमातून योजना बनवणे ही कामे "सकाळ'ने सातत्याने केली, असे गौरवोद्‌गारही दरेकर यांनी काढले. 

आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून "सकाळ'बरोबर असलेल्या ऋणानुबंधांचा भावूक उल्लेखही दरेकर यांनी केला. त्यावेळी वाचकपत्रे छापून येण्यासाठीच्या आपल्या प्रयत्नांवर "धडपडणारा युवक' हे सदर तेव्हा "सकाळ'मध्ये छापून आले होते. तोच मी आज "विरोधी पक्षनेता' म्हणून "सकाळ'च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून हजेरी लावतो, हा मला सुखद योगायोग वाटतो, असेही दरेकर म्हणाले.

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

sakal sanman sohala This honor is important to guide the next generation Praveen Darekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com