ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

"बापाचा बाप', "नशीब फुटकं सांधून घ्या', "कोयना स्वयंवर' या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. शिवाय "आंधळं दळतयं', "यमराज्यात एक रात्र', "आसुनी खास घरचा मालक' अशी त्यांची लोकनाट्य तुफान गाजली.

मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे आज (ता. 15) दुपारी 12 वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंड असा परिवार आहे. संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजा मयेकर यांनी नाटक, लोकनाट्य, चित्रपट, मालिका अशा सर्वच क्षेत्रात कामं केली. त्यांना "लोकनाट्यांचा राजा' हा किताबही मिळाला होता. जवळजवळ 60 वर्षे त्यांनी अभिनय क्षेत्र गाजवले.

हेही वाचा - मोबाईल कॉलिंग 25 टक्क्यांनी महागणार

कृष्णाराव गणपत साबळे तथा शाहिर साबळे यांच्यामुळे वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. आणि त्यांच्या अभिनयाचा प्रवास हा दशावतारी नाटकापासून सुरू झाला. "लोकनाट्या'द्वारे व्यावसायिक रंगभूमी त्यांनी फार जवळून पाहिली. "कळत नकळत', "गुंतता ह्रदय हे', "महानंदा', "सावळो गोंधळ', "गोंधळात गोंधळ', "वस्त्रहरण', "हळू बोला', "घोडे हसले', "दोघे बहिणी' आदी जवळजवळ एकून पाचशेहून अधिक कलाकृतीत त्यांनी काम केले आहे. "गुंतता ह्रदय हे'मधील त्यांनी साकारलेली मास्तरांची भूमिका फार गाजली. कोकणाबाबत त्यांना प्रचंड आस्था होती.

हेही वाचा - आजपासून तुमचा EMI होणार कमी

समाधान व्यक्त कराणारी बरीच मालवणी नाटकेही त्यांनी केली आहेत. शाहिर साबळे यांनी राजा मयेकर आणि कृष्णकांत दळवी यांच्या साथीने "शाहिर साबळे आणि पार्टी'ची स्थापना केली. "बापाचा बाप', "नशीब फुटकं सांधून घ्या', "कोयना स्वयंवर' या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. शिवाय "आंधळं दळतयं', "यमराज्यात एक रात्र', "आसुनी खास घरचा मालक' अशी त्यांची लोकनाट्य तुफान गाजली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Senior actor Raja Mayekar dies at 90