ऑनलाईन दारू मागविणे ज्येष्ठ नागरिकाला पडले महागात; तब्बल 'इतक्या' रुपयांचा बसला फटका...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 27 June 2020

रूळमधील एका ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन दारू मागवणे चांगलेच महागात पडले आहे. अज्ञात टोळीने या ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन दारू पाठविण्याचा बहाणा करून त्यांच्या मोबाईल फोनवर क्युआर कोड स्कॅन करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यातील 43 हजारांची रक्कम परस्पर काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे.

नवी मुंबई (वार्ताहर) : नेरूळमधील एका ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन दारू मागवणे चांगलेच महागात पडले आहे. अज्ञात टोळीने या ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन दारू पाठविण्याचा बहाणा करून त्यांच्या मोबाईल फोनवर क्युआर कोड स्कॅन करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यातील 43 हजारांची रक्कम परस्पर काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. नेरूळ पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात टोळीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. 

तीन महिन्यानंतर प्रथमच मध्य रेल्वे घेणार मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक...

या प्रकरणात फसवणूक झालेले 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक नेरूळ सेक्टर-25 मध्ये कुटुंबासह राहण्यास असून, ते कस्टम विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. या ज्येष्ठ नागरिकाला दारूची गरज असल्याने त्यांनी गत आठवड्यात ऑनलाईन दारू मागविण्यासाठी गुगलवरून नेरूळमधील प्रीतेश वाईन शॉपचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. 

या वर्षातील सर्वात मोठं प्रॉपर्टी डिल, दोन अपार्टमेंटसाठी मोजले तब्बल 136 कोटी रुपये 

या वेळी त्यांना गुगलवरून एक मोबाईल नंबर सापडल्याने त्यांनी मोबाईल फोनवर संपर्क साधून दारूची ऑर्डर दिली. दारूचे बिल 3900 रुपये झाल्याने ज्येष्ठ नागरिकाने आपल्या एटीएमची माहिती देऊन त्या माध्यमातून दारूचे बिल देण्याचा प्रयत्न केला. या वेळी समोरील व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकाच्या एटीएममधून फक्त 3500 रुपये काढून घेतले. त्यानंतर त्याने शिल्लक 400 रुपये घेण्यासाठी दुसऱ्या कार्डाची मागणी केली. 

हात दिला की खांद्यावर बसायचं ! पनवेलमध्ये बारचालक आता काय करतायत वाचा...

यावर ज्येष्ठ नागरिकाच्या मुलीने फोन पेद्वारे 400 रुपये पाठविणार असल्याचे सांगितल्यानंतर समोरील व्यक्तीने आपला व्हॉट्सऍप नंबर देऊन त्यावर एक क्युआर कोड तिला पाठवून दिला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाच्या मुलीने फोन पेद्वारे क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रथम 19,766 रुपये व दुसऱ्या वेळेस 39,532 रुपये असे एकूण 39 हजार 532 रुपये तिच्या खात्यातून वळते झाल्याचे मेसेज तिच्या मोबाईल आले. 

कौतुकास्पद! मुंबईतील आदिवासी पाडे ग्रीन झोनमध्येच, उत्तम नियोजनाचा सकारात्मक परिणाम​

त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने व त्याच्या मुलीने व्यक्तीच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याचे मोबाईल फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे ज्येष्ठ नारिकाच्या कुटुंबीयांना लक्षात आल्यानंतर त्यांनी दोन दिवसांपूर्वी नेरूळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार नेरूळ पोलिसांनी अज्ञात टोळीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: senior citizen cheated by goons whilw ordering online order..