
Satyajeet Tambe : "तांबेंच्या निमित्ताने मामांची जिरवता येईल काय? असा डाव असावा"
नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा मोठ्या मताने दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले सत्यजीत भाजपमध्ये प्रवेश करणार का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत. (Nashik Graduate Constituency Election Satyajeet Tambe first reaction after win)
सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीत ६८ हजार ९९९ मतं मिळवत विजय मिळवला आहे.
सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर महाविकास आघाडीने महिला नेत्या शुभांगी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत ही निवडणूक चुरशीची बनली होती.
काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण देखील वाढले होते. सत्यजित तांबे यांनी मामाला (बाळासाहेब थोरात) मामा बनवले अशी टीका होत होती. दरम्यान शिवसेनेने यावर भूमिका स्पष्ट केली आहे.
काँग्रेसचे उमेदवार सुधीर तांबे यांनी घोळात घोळ घातला व ऐन वेळेस माघार घेऊन सत्यजीत तांबे या आपल्या चिरंजीवास अपक्ष म्हणून अर्ज भरायला लावला. पिता की पुत्र हे आधीच ठरवायला हवे होते. मतदारसंघात तांबे व काँग्रेसने मतदारांची नोंदणी केली व कोणत्याही परिस्थितीत तांबे हेच जिंकणार होते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
"काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे सत्यजीत हे भाचे. त्यामुळे मामांची कोंडी झाली. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वास हा नगरचा तिढा शांत डोक्याने व सन्मानाने सोडवता आला असता. झाकली मूठ तशीच ठेवून सत्यजीत तांबे हेच काँग्रेसचे उमेदवार असा पवित्रा घेता आला असता. पण तांबे यांच्या निमित्ताने मामांची जिरवता येईल काय? असा डाव कदाचित असावा, त्यात किती तथ्य हे त्यांनाच माहिती", असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटले आहे.