भाजपची भूमिका म्हणजे शिवसेनेला संपवण्याचं षड्यंत्र : सत्तार

टीम ई-सकाळ
Friday, 1 November 2019

भाजपला फक्त मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिसत आहे, मात्र, राज्यात सध्या शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत हे दिसत नाहीय. 

सध्या महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा चालू आहे ती सरकार स्थापन करण्याची आणि जागा वाटपाची. मुख्यमंत्री आमचाच यावरून शिवसेना आणि भाजप या पक्षांमध्ये चढाओढ सुरू असून जागा वाटपात मित्रपक्षांमध्ये एकमत होत नाहीय. त्यात शिवसेना नेत्याने केलेल्या एका वक्तव्याने युतीमध्ये अजूनच दरी निर्माण झाली आहे.

''शिवसेना ही राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देते, मात्र भाजपला फक्त सत्ता हवी आहे. जागा वाटपासंदर्भात चर्चा न होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. शिवसेनेला संपवण्याचा डाव भाजपने आखला आहे,'' असे शिवसेना नेते आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.

- फडणवीस घेणार 5 नोव्हेंबरला वानखेडेवर मुख्यमंत्रीपदाची शपथ?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी निवडणुकीआधी युती पक्षांसाठी ज्या गोष्टी ठरवल्या त्यानुसार भाजपच वागत नसल्याचेही ते म्हणाले आहेत. राज्यात शिवसेना मोठ्या भावाची भूमिका निभावत असताना आम्हाला छोटं ठरवण्याचं भाजपचं षड्यंत्र सेना प्रमुखांनी ओळखलं आहे. तसेच भाजपला फक्त मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिसत आहे, मात्र, राज्यात सध्या शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत हे दिसत नाहीय. 

- राष्ट्रवादीच्या नेत्याने सुचवलेला 'हा' पर्याय भाजप-शिवसेना निवडणार?

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवट लागू होण्याबाबत केलेलं वक्तव्य हे सेनेवर दबाव आणण्यासाठी केलं असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊच देणार नाही. 7 नोव्हेंबरपर्यंत राज्यात सरकार स्थापन होईल, पण आम्हाला देण्यात येणारी आश्वासनं लेखी स्वरुपात हवी आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्व अधिकार असून ते योग्य निर्णय घेतील, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला. 

- VIDEO : 'मी आलोय काळजी करू नका'... शरद पवारांचा बळीराजांना भावनिक आधार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader Abdul Sattar said about BJPs plan to end of Shivsena