'त्या' वक्तव्यावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण, म्हणाले...

पूजा विचारे
Monday, 17 August 2020

डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय राऊतांनी  यु टर्न घेतला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबईः एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? इकडून तिकडून गोळा केलेले लोक तिथं आहेत. मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. या वक्तव्यावरुन डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय राऊतांनी  यु टर्न घेतला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. माझी तशी भावनाही नव्हती. अपमान आणि कोटी यांच्यातील फरक जाणून घेतला पाहिजे. अशाप्रकारच्या कोट्या राजकारणात होतात, वकिलांवरही होतात. कोट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा इतर कुणावरही होतात. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून एखादी कोटी झाली. खरंतर त्याचं कौतुक केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

तसंच मी काय बोललो आहे हे समजून न घेता काही राजकीय मंडळी काही मोहीम चालवणार असतील तर त्याला थारा देणार नाही. मी डॉक्टरांचा अपमान केलेला नसून माझ्याकडून बोलण्याच्या ओघात एखादी कोटी निघून गेली त्याचं कौतुक डॉक्टरांनी केलं पाहिजे. डॉक्टरांची ताकद एवढी अफाट आणि अचाट असते. की त्यांनी कंपाऊंडर घडवले आहेत. हे कौतुक आहे, याचा सन्मान झाला पाहिजे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हेही वाचाः  सोशल मीडियावर एखाद्याला ब्लॉक करण्यासाठी केंद्राने आदेश द्यावेत; फेसबुकची उच्च न्यायालयाला माहिती

संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधात नाराजी व्यक्त करत संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी डॉक्टरांकडून होऊ लागली आहे. राऊत यांनी समस्त डॉक्टरवर्गाची माफी मागावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने केली आहे. या  वक्तव्यावरुन ‘मार्ड’ संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. मार्ड ही डॉक्टरांची संघटना आहे.  या प्रकरणावर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे. 

जागतिक आरोग्य संघटना ही राजकीय संघटना झाली आहे. हे माझंच नाही तर अनेक देशांचं म्हणणं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे त्यांना फटाकलं आहे. संबंधही तोडलेत. कारण तिथे डॉक्टर कमी आणि राजकारणी जास्त झाले आहेत. कोरोनाचा फैलाव होण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जबाबदार असल्याचं अनेक देशांनी म्हटलं आहे. येथील डॉक्टरांना ते विधान गांभीर्याचं घेण्याची गरज नसल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचाः  मोठी बातमी: शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरुन आली मोठी अपडेट

डॉक्टर मंडळी आमचेच आहेत. जेव्हा डॉक्टरांवर काही संकट आले तेव्हा मी स्वत: व्यक्तीशा अनेकदा त्यांच्या मदतीसाठी गेलो आहे. या लॉकडाऊन आणि कोरोना काळात शिवसेनच्या अनेक लोकांनी अफाट बिलं घेतात म्हणून डॉक्टरांविरोधात आंदोलने केली आहेत. डॉक्टरांबाबत अशी भूमिका घेणं योग्य नाही, डॉक्टर हे कोरोना काळात योद्ध्याची भूमिका बजावत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

ज्या मार्ड संघटनेने निषेध केला आहे, त्यांचा तसा अधिकार आहे. मार्डच्या अनेक संप आणि मागण्यांच्या संदर्भात मी त्यांची बाजू भक्कमपणे मांडली आहे. मुळात मी काय बोललो आणि सांगितलं हे समजून न घेता एका विशिष्ट विचाराचे राजकीय लोकं ही मोहिम चालवत असतील आणि संपूर्ण डॉक्टर मंडळी आपल्यासोबत आहेत असा अभास निर्माण करत असतील तर ते बरोबर नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

हेही वाचाः  संजय राऊतांनी डॉक्टरांची माफी मागावी नाही तर...

जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. माफी मागण्याआधी मी काय बोललो ते समजून घ्या. मी अपमानच केलेला नाही. माझी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रश्नावर होती. बोलण्याच्या ओघात एक शब्द येतो आणि त्यावर अशा पद्धतीने राजकारण होत आहे. हे होऊ नये असं मला वाटतं, असंही संजय राऊत म्हणालेत.

Shivsena leader sanjay raut explanation is given on controversial statement


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena leader sanjay raut explanation is given on controversial statement