घंटानाद आंदोलनाची छायाचित्रे पाहिल्यावर समजलं की...शिवसेनेचा भाजपला चिमटा

पूजा विचारे
Monday, 31 August 2020

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखातून विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला आहे. मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत. आधी लोकांना जगवा, मग पुढचे पुढे पाहू, असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे.

मुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या अग्रलेखातून विरोधकांवर पुन्हा एकदा निशाणा साधण्यात आला आहे.  लोकांना मनःशांती आणि पोटशांती हे दोन्ही मंदिरांच्या माध्यमातून मिळायला हवी, पण कोरोनाचा स्फोट पुन्हा झालाच तर त्याची जबाबदारी विरोधी पक्ष घेणार आहे काय?, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत. आधी लोकांना जगवा, मग पुढचे पुढे पाहू, असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. दररोज येणारे आकडे राज्यातील परिस्थितीची जाणीव करून देत असून, राज्यातील रुग्णांची संख्या आठ लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. अशा स्थितीत सरकारकडून सावध पावले टाकली जात असताना भाजपानं मंदिरं खुली करण्याची मागणी करत राज्यभर घंटानाद आंदोलन केलं. मंदिरं उघडी करण्याबद्दल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली होती. त्या भूमिकेवरून शिवसेनेनं निशाणा साधला आहे. तसंच देवेंद्र फडणवीसांनाही अग्रलेखातून चिमटे काढले आहेत.

हेही वाचाः  पालघर साधू हत्याकांड प्रकरणः  तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे बडतर्फ

राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजपने घंटानाद आंदोलन केले. त्यापार्श्वभूमीवर सामनातून विरोधकांना खडेबोल सुनावलेत. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ राबवायचे हे लोकांना कळते असे देवेंद्र फडणवीस सांगतात. पण भाजपतर्फे जे घंटानाद आंदोलन झाले त्याची छायाचित्रे पाहिल्यावर समजले या ‘डिस्टन्सिंग’ची कशी जोरदार काशी झाली आहे. त्यामुळे मंदिरे उघडण्याच्या प्रश्नी विरोधकांनी धसमुसळेपणा करण्याआधी महाराष्ट्राची स्थिती समजून घेतली पाहिजे. ज्या ‘मनःशांती’चा उद्घोष राज्याचे विरोधी पक्षनेते करतात त्यांनी मनःशांतीचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

अधिक वाचाः  रो-रो फेरीबोटीचा आनंद सुरुच राहणार, प्रवाशांचा वाढतोय प्रतिसाद

मनःशांतीचा मार्ग त्यागातून जात असतो. मनःशांती राष्ट्रीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यातही असते. मंदिरांची टाळी उघडायला हवीत, पण राजकीय मनःशांतीसाठी नकोत. आधी लोकांना जगवा, मग पुढचे पुढे!, असा सल्लाही शिवसेनेनं दिला आहे आणि फडणवीसांना चिमटा काढला आहे.

हेही वाचाः  अनलॉकनंतरही ग्राहकांची पाठ; सणासुदीला गजबलेल्या मुंबईकरांच्या 'या' फेव्हरेट ठिकाणाला अवकळा

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हणण्याची प्रथा आहे, पण सध्याच्या काळात विरोधी पक्षांपुढे सत्तेचे शहाणपण चालत नाही, असे म्हणणे अधिक व्यावहारिक ठरेल. विरोधी पक्ष नावाचा प्राणी कधी कोणत्या प्रश्नी उधळेल ते सांगता येत नाही. महाराष्ट्रातील प्रबळ विरोधी पक्षाने काल (२९ ऑगस्ट) सर्वत्र घंटानाद केला. कुठे थाळीनाद केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाचेक महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील मंदिरे उघडा या मागणीसाठीच हा घंटानाद होता. विरोधी पक्षाचे हे आंदोलन नक्की धार्मिक होते की राजकीय, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे, असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

Shivsena saamana editorial bjp ghantanaad protest devendra fadnavis


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena saamana editorial bjp ghantanaad protest devendra fadnavis