धक्कादायक... डोंबिवलीतील रस्त्यांवर धावतात चक्क विनानंबर प्लेट रिक्षा

शर्मिला वाळुंज
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

नवी कोरी रिक्षा... रस्त्यावरून धावते खरी... परंतु त्यात बसावे की नाही... यावरून डोंबिवलीकरांमध्ये संभ्रम आहे. कारण त्या रिक्षावर नोंदणी क्रमांकच नाही; त्यामुळे रात्रीच्या वेळेस अशा रिक्षांतून प्रवास करायचा कसा, असा प्रश्‍न महिला प्रवाशांमधून केला जात आहे. डोंबिवलीतील रस्त्यांवर सध्या अशा नंबर नसलेल्या नव्या कोऱ्या रिक्षा धावत असून प्रवाशांमध्ये त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडून नोंदणी क्रमांक मिळाला असला, तरी "नंबर प्लेट' मिळत नसल्याचे कारण रिक्षाचालक सांगत तशाच रिक्षा रस्त्यावर दामटवत आहेत.
 

ठाणे : नवी कोरी रिक्षा... रस्त्यावरून धावते खरी... परंतु त्यात बसावे की नाही... यावरून डोंबिवलीकरांमध्ये संभ्रम आहे. कारण त्या रिक्षावर नोंदणी क्रमांकच नाही; त्यामुळे रात्रीच्या वेळेस अशा रिक्षांतून प्रवास करायचा कसा, असा प्रश्‍न महिला प्रवाशांमधून केला जात आहे. डोंबिवलीतील रस्त्यांवर सध्या अशा नंबर नसलेल्या नव्या कोऱ्या रिक्षा धावत असून प्रवाशांमध्ये त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाकडून नोंदणी क्रमांक मिळाला असला, तरी "नंबर प्लेट' मिळत नसल्याचे कारण रिक्षाचालक सांगत तशाच रिक्षा रस्त्यावर दामटवत आहेत.

वाचा संपूर्ण बातमी - ऐकावं ते नवलंच, आता झालाय 'कंडोम स्कॅम' 

डोंबिवलीतील रस्त्यांवर सध्या 13 हजार अधिकृत रिक्षा धावतात; तर अनधिकृत रिक्षांची संख्या दुप्पट-तिप्पट आहे. त्यात दिवसेंदिवस नवीन रिक्षांची भरही पडते. शहरातील रस्त्यांवरून नव्या कोऱ्या रिक्षा धावत असून त्यांना क्रमांक नसल्याने या रिक्षांविषयी प्रवाशांमध्ये संभ्रम आहे. अनेकदा रिक्षाला नोंदणी क्रमांक नसल्याने प्रवासी तिच्यातून प्रवास करणे टाळतात.

राज्य सरकारने रिक्षा परवाने खुले केल्याने परवानाधारक रिक्षा घेतात आणि त्या दुसऱ्या चालकांस व्यवसाय करण्यास दिल्या जातात. अनेक चालकांकडे बॅच, परवाना नसल्याचे आरटीओच्या कारवाईत आढळून आले आहे. तरीही अशा चालकांची संख्या कमी होताना दिसत नाही. या अनधिकृत, विनापरवाना, बिनानंबरच्या वाहनांवर कारवाई करणे वाहतूक पोलिसांनाही अवघड होत असल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - नवी मुंबई काबीज करण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी.

रिक्षाला नंबर नाही, रिक्षाचालकाविषयी माहितीही रिक्षात लावलेली नसते. त्यामुळे अशा नंबर नसलेल्या रिक्षातून रात्रीच्या वेळेस प्रवास करणे मी शक्‍यतो टाळते, असे प्रतीक्षा नाईक यांनी सांगितले. रात्रीच्या वेळेस अनेकदा रिक्षांवर तरुण लहान मुले असतात. त्यामुळे नंबर नसलेल्या रिक्षाच प्रवासासाठी नको वाटतात, असेही त्या म्हणाल्या.

तर महेश दातार म्हणाले, नव्या रिक्षा जास्त प्रमाणात सध्या दिसत आहेत. हे रिक्षाचालकही लांबचे भाडे नाकारतात. त्यांचा नंबरच रिक्षावर नसल्याने त्यांची तक्रारही करता येत नाही. त्यामुळे या नव्या रिक्षाचालकांचीही दादागिरी प्रवाशांना सहन करावी लागत आहे. 

दरम्यान, याबाबत आरटीओ अधिकाऱ्यांना विचारले असता, डिलर्सकडून रिक्षा चालकांना नंबर प्लेट बसवून दिली जाते. प्लेट बसवण्यात दिरंगाई करणाऱ्या डीलर्सवर आरटीओने कारवाई केली आहे. डोंबिवलीमध्ये विना नंबरची वाहने धावत असतील तर त्यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नंबरप्लेट येईल तेव्हा येईल... 
रिक्षाचालकांना विचारले असता, आम्ही परवान्यावर रिक्षा घेतली आहे, क्रमांकही मिळाला आहे. परंतु प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार त्यांच्याकडून नंबर प्लेट येते, ती लावणे बंधनकारक आहे. ही नंबर प्लेट मिळण्यास साधारण महिनाभराचा कालावधी लागतो. आता रिक्षा घेतल्यानंतर महिनाभर आम्ही रिक्षा उभीच केली तर त्याचा आम्हाला फायदा काय? कर्जावर घेतलेल्या रिक्षाचे हप्ते तर लगेच सुरू होतात. मग ते हप्ते आम्ही कसे आणि कोठून फेडणारय त्यामुळे नंबर येईल तेव्हा येईल; आम्ही रिक्षा चालवण्यास सुरुवात केली आहे. 

नंबर नसलेल्या अनेक रिक्षा; तसेच दुचाकी सध्या शहरातील रस्त्यावरून धावत आहेत. अशा चालकांवर कारवाई करणे शक्‍य होत नाही. तरीही सुमारे तीन हजार चालकांवर गुन्हे दाखल केले असून दंडापोटी 40 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर वाहन परवाने दिले जात असल्याने बॅच नसलेले चालकही वाहने रस्त्यावर उतरवत आहेत. पार्किंगच्या समस्येवर सध्या वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून सम-विषय तारखेप्रमाणे रितसर अधिकृत पार्किंग झोन तयार करावेत, याविषयी सूचना पालिकेला केली जाणार आहे. 
- सतेज जाधव 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक 
डोंबिवली शहर वाहतूक शाखा 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shocking ...without number plate rickshaws run on the streets of Dombivali