स्पेशल रिपोर्ट - माशांच्या 47 प्रजातींचे अस्तित्व धोक्‍यात !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन संस्थेचा अहवाल; मासेमारी संकटात 

उरण-अलिबाग : वाढते नागरीकरण आणि औद्योगिकरणामुळे मुंबई व रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत आहे. याचा फटका मासेमारी व्यवसायाला बसला असून समुद्रकिनारा, तसेच खाडीलगतच्या मासळीचे प्रमाण घटले आहे. अलीकडेच सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन या संस्थेने मुंबई परिसरातील व किनारपट्टीच्या परिसरात मत्स्यव्यवसायावर संशोधन केले. या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई व रायगड जिल्ह्यात सागरी व खाडी परिसरातील 125 माशांच्या जाती होत्या. मात्र त्यापैकी केवळ 78 जाती शिल्लक राहिल्या असून उर्वरित 47 जातींचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. 

हे वाचलंत का ? - घरातले झोपेत असताना तो बाथरूममध्ये गेला आणि...

प्रकल्पाला जमिनी दिलेले भूमिपुत्र आणि बंदरांच्या वाढत्या विकासामुळे आणि सागरी प्रदूषणामुळे मत्स्य दुष्काळात सापडलेले सागरपुत्र आजच्या विकासामुळे देशोधडीला लागले आहेत. या सागरपुत्रांच्या समस्यांची कुणीही दखल घेताना दिसत नसल्यामुळे सागरपुत्राला सागरी लाटांबरोबर झुंज देण्यापेक्षा विकासाच्या लाटांनी ओलाचिंब होणाऱ्या सागरी किनाऱ्याच्या प्रदूषणाची भीती वाटत आहे. 

गेल्या 10 ते 15 वर्षांच्या काळात या ठिकाणी अतिरिक्त मासेमारी करण्यात आली. शिवाय मासेमारीसाठी पर्ससिन जाळ्यांचा वापर, तसेच एलईडी पद्धतीने मासेमारी करण्यात आली. यामुळे मासेमारी संकटात आली आहे. या खाडीत मिळणारे बोंबील, ढोमी, मांदेली, घोळ, कलेट, कोलंबी, शिंगाळी, चिंबोरी, खुबे, कालवे, निवट्या इत्यादी माशांचे प्रकार कोळी बांधवांना दैनंदिन रोजगार मिळवून देतात. त्यामुळे तेथील कोळी बांधवांनी माशांची निर्यात सुरू केली. यासाठी उरण तालुक्‍यातील दिघोडे गावात मत्स्य प्रक्रियेबाबत सहकारी कारखानाही सुरू करण्यात आला. या ठिकाणाहून मिळालेली मासळी केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातच पाठविली जात नसून देशांतील सर्व राज्यांत ती पाठविली जाते. मात्र माशांच्या जातींप्रमाणे त्यांच्या संख्येतही घट झाल्याने कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

हे वाचलंत का ? - 'ती' बंद करायला विसरली; अन् त्याने...

जिल्ह्यात प्रमाणापेक्षा अधिक होणारी मासेमारी पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असून मच्छीमारांना या प्रजातीच्या माशांचे प्रमाण मिळणे दुर्मिळ झाले आहे. शार्कसह अन्य प्रजातींच्या मासेमारीस शासनाने बंदी घातली असूनही खवय्यांसाठी किंवा औषधी कारणांसाठी या प्रजातीची मासेमारी सुरूच आहे. नामशेष होत असलेल्या या प्रजातींच्या अल्पवयीन माशांची मुंबईसह राज्यातील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

रायगड जिल्ह्याला 240 किलोमीटरचा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल असला तरी मागील काही वर्षांत या किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. आर्थिक लाभासाठी केल्या जात असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे किनाऱ्याच्या परिसरात आढळणाऱ्या माशांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मच्छीमार बांधवांना मत्स्य दुष्काळाची चिंता सतावत आहे. रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये करंजा, मोरा हा परिसर मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावर कोळी समाजाची मोठी वस्ती आहे. या संपन्न सागरी किनाऱ्याने कोळी समाजाची नेहमीच भरभराट केली आहे. 

हे वाचलंत का ? - वर्षभरानंतर श्रीनिवास परदेशातून आला आणि त्यांच्यात झालं...

या ठिकाणी प्रमाणात घट 
आता पनवेल कोळीवाडा हे क्षेत्र नवी मुंबई विमानतळबाधित झाले, तर माजगाव, मुरूड, नांदगाव, एकदरा, राजापुरी दिघी, तुरूंबाडी, आदगाव, भरडखोल, बोर्ली, कोर्लई ही सर्व गावे दिघी पोर्टमुळे बाधित होणार आहेत. उरण तालुक्‍यांतील जेएनपीटीबाधित गव्हाण हनुमान कोळीवाडा, पाणजे गाव, करंजा इन्फ्रा प्रोजेक्‍टमुळे बाधित करंजा गाव व सात पाडे या समुद्रकिनाऱ्यावरील खाडीलगतचा परिसर येथील मासे कमी झाल्याने येथील कोळी समाजावर उपासमारीचे सावट पसरले आहे. 

ही आहेत संकटे 
डिझल परतावा, होड्या बांधणी व दुरुस्तीसाठी आवश्‍यक जागा नसणे, मासळी सुकविण्यासाठी जागा नसणे, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था नसणे, महिलांना मासे विक्रीसाठी अपुरी व्यवस्था असणे, यातच तिसरी मुंबई घोषित केल्याने या भागात येणारे नवे प्रकल्प व येणारे कोस्टल रोड, बेसुमार खारफुटीची कत्तल यामुळे या क्षेत्रांतील भागातून माशांच्या जाती नामशेष होत आहेत. अशी अनेक संकटे आज पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसमोर आव्हान म्हणून उभी ठाकली आहेत. 

हे वाचलंत का ? - मॉलमधील अनधिकृत दुकानांवर हातोडा 

निरीक्षणानुसार तारली, पाला आदी माशांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्याची कारणे वेगवेगळी असली तरी समुद्रातील मासे टिकवून ठेवण्यासाठी जनतेचा सहभागही महत्त्वाचा आहे. 
- रत्नाकर राजम, प्रभारी सहायक आयुक्‍त, मत्स्य विभाग, रायगड. 

special report 47 species of fishes are on the verge of extinct


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special report 47 species of fishes are on the verge of extinct