esakal | जादा गणपती वाहतुकीतून एसटीला मिळाले 7 कोटी 82 लाखांचे उत्पन्न : ॲड.अनिल परब
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

जादा गणपती वाहतुकीतून एसटीला मिळाले 7 कोटी 82 लाखांचे उत्पन्न : ॲड.अनिल परब

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात सोडलेल्या जादा गाड्यांच्या वाहतुकीतून एसटीला तब्बल 7 कोटी 82 लाख 32 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत 5 ते 20सप्टेंबर दरम्यान 'गणपती स्पेशल' 3290 बसेसद्वारे सुमारे 3 लाख 96 हजार प्रवाशांनी एसटीतून सुखरूप प्रवास केला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब (anil Parab) यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीवर दाखविलेल्या प्रेमामुळेच कोट्यावधीचे उत्पन्न मिळाले, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, गणेशोत्सवात प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा प्रदान करणाऱ्या चालक-वाहकांबरोबरच त्यांना साथ देणारे यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकारी यांचेही ॲड.परब यांनी कौतुक केले आहे.

हेही वाचा: जागर आदिशक्तीचा, उत्सव नवरंगांचा; ‘सकाळ’चा उपक्रम

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. ‍किंबहुना एसटी, गणपती व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा एसटी महामंडळाने चाकरमान्यांसाठी 2200 गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, सुरक्षित प्रवास म्हणून चाकरमान्यांनी एसटीवर विश्वास दाखविल्याने अवघ्या काही दिवसांतच जादा गणपती स्पेशल गाड्या फूल झाल्या होत्या. चाकरमान्यांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे एसटीला गणेशोत्सवादरम्यान सुमारे 3290 गाड्या सोडाव्या लागल्या. 5 ते 20 सप्टेंबर दरम्यान तब्बल 3290 बसेसद्वारे 8299 फेऱ्या पार पडल्या. यामधून एसटीला 7 कोटी 82 लाख 32 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले, असे ॲड. परब यांनी सांगितले.

हेही वाचा: जनमन उत्सव: दुसरा 'जननी जन्मभूमी कौल’

यंदा गणेशोत्सवादरम्यान कोणतेही विघ्न न येता जादा वाहतूक सुरळीत पार पडली. एसटी महामंडळाच्या नियोजनबद्ध सेवेमुळे भाविकांना मुंबई, ठाणे, पालघर व आसपासच्या परिसरातून थेट गावापर्यंत सुरक्षित पोहचविण्याचे अभिवचन एसटीने पूर्ण केले आहे. भविष्यातहि चाकरमान्यांच्या मदतीला एसटी नेहमीच तत्पर असेल, अशी आशा मंत्री, ॲड. परब यांनी व्यक्त केली.

loading image
go to top