राजस्थानातून विद्यार्थ्यांना आणण्यासाठी सरकारच्या आदेशास एसटीची नकारघंटा

प्रशांत कांबळे
Tuesday, 28 April 2020

परिवहन मंत्री अॅड्. अनिल परब यांच्या उपस्थितीत मुख्यालयात झालेल्या बैठकीत बसगाड्या देण्यास एसटी महामंडळाने नकार दिला आहे.  

मुंबई : लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता. यासंदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केल्याचे ट्विट त्यांनी केले होते. त्यानंतर परिवहन विभागाचे मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी एसटी महामंडळाच्या 92 बसगाड्या तयार ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, सोमवारी (ता. 27) परिवहन मंत्री अॅड्. अनिल परब यांच्या उपस्थितीत मुख्यालयात झालेल्या बैठकीत बसगाड्या देण्यास एसटी महामंडळाने नकार दिला आहे.  

महत्वाची बातमी ः मुंबईतील रुग्णसंख्येचा आलेख वाढताच; दिवसभरात 15 जणांचा मृ्त्यू

दरवर्षी महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थी आयआयटी, मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी राजस्थानमधील कोटा येथे जातात. यावर्षी तेथे गेलेल्या सुमारे 2000 विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. पहिला लॉकडाऊन 14 एप्रिलला संपणार होता; ही मुदत 3 मेपर्यंत वाढवण्यात आल्याने तेथे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी परत येण्यासाठी राज्य सरकारला साकडे घातले होते. या विद्यार्थांना आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसगाड्यांचा वापर करण्याचा पर्याय होता. त्यानुसार परिवहन विभागाने सुमारे 92 बसगाड्यांचे नियोजन करण्याचे आदेश दिले होते. एका चालकाला एवढा पल्ला गाठणे कठीण असल्याने प्रत्येक बसवर दोन चालक पाठवले जाणार होते. विद्यार्थ्यांना आणताना सोशल डिस्टन्सिंग, आरोग्यरक्षण आदी नियमांचे पूर्णपणे पालन व्हावे, याबाबत विचार झाला होता. 

मोठी बातमी ः संकट आहे गंभीर, मात्र मुंबई महापालिका आहे खंबीर, पण संकट दहा पट वाढलं तर... ? याला कारण आहे 'हे'...

या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. 27) एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत प्रशासनाने कोट्याहून विद्यार्थ्यांना आणण्यासाठी बसगाड्या देणार नसल्याचे स्पष्ट केल. जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली. आपातकालीन परिस्थितीत कर्तव्य बजावण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना तयारीत राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु, नंतर हे नियोजन फिस्कटल्यामुळे महामंडळाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही बैठक झाल्यानंतर दूरध्वनी घेतला नाही; तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. 

हे वाचा ः धक्कादायक ! 7 मृतदेह 24 तास तसेच पडून... मृत्यू पश्चात मृतदेहांची हेळसांड !

पंजाबमधील भाविकांनाही नकार
पंजाब आणि इतर राज्यांतून नांदेड येथील गुरुद्वारा येथे आलेले भाविक लॉकडाऊनमुळे अडकले होते. त्यानंतर गुरुद्वारा समितीने एसटी महामंडळाकडे 50 बसगाड्यांची मागणी केली होती. ही मागणीही अमान्य करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे पंजाब परिवहन महामंडळाने नांदेडला बसगाड्या पाठवून भाविकांना परत नेल्याचे सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST refuses to bring students stucked in kota rajasthan