ठाणे जिल्हा परिषदेचा 124 कोटींचा अर्थसंकल्प सादर; 'या' विभागावर विशेष भर... 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

अर्थसंकल्पात ठाणे जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेला बळकटीकरणासह गावपाड्यातील रस्ते दुरुस्ती करणे, नवीन रस्ते तयार करणे यासाठी बांधकाम विभागाला भरीव निधी देण्यात आला आहे.

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेचा सन 2020-21 चा मूळ अर्थसंकल्प नुकताच सादर करण्यात आला. यात मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 23 कोटी रुपयांची अधिक निधी उपलब्ध करण्यात आला असून यंदाचा अर्थसंकल्प 124 कोटी रुपयांवर झेपावला आहे. यावेळी शिक्षण,  बांधकाम,  कृषी आणि पाणी पुरवठा या विभागांवर विशेष भर देण्यात आला आहे.

लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम; ठाणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट...

या अर्थसंकल्पात ठाणे जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेला बळकटीकरणासह गावपाड्यातील रस्ते दुरुस्ती करणे, नवीन रस्ते तयार करणे यासाठी बांधकाम विभागाला भरीव निधी देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजना सक्षम करण्याबरोबरच जिल्हा टंचाईमुक्त करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच  शेतकऱ्यांच्या हिताच्या व त्यांच्या पिकांच्या संरक्षणासाठीच्या योजनाही हाती घेण्यात आल्या असून त्यासाठी गतवर्षीच्या तुलनेत अधिक निधीची यंदा तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या वाढीसह विविध विभागांना वाढीव निधी मिळणार असल्याने जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे दिसून येत आहे. 

मास्क घातला नाही, गेल्या सहा दिवसात 'इतक्या' लोकांनी मोजले हजार रुपये   

राज्यात ठाणे जिल्हा परिषद ही सधन जिल्हा परिषद मानली जात होती. मात्र,  वसई-विरार पट्टा, कल्याण-डोंबिवलीतील 27 गावे आदी वगळल्याने जिल्हा परिषदेचे उत्पन्न सुमारे 120 कोटी रुपयांवरून थेट 60 ते 70 कोटींवर घसरले होते. मात्र, मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षा मंजुषा जाधव,  उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांच्या पाठपुराव्यामुळे प्रथमच जिल्हा परिषदेला सरकारकडून थकीत मुद्रांक शुल्क व बॅंकांकडील ठेवींची 35 कोटींची रक्कम मिळाल्याने सन 2019-20 चा जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सुमारे 101 कोटींवर झेपावला. 

मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई यशस्वी, पारनेरच्या 'त्या' पाच नगरसेवकांची घरवापसी...

यंदाच्या वर्षी मागील अखर्चित निधी व शासनाकडून मिळणारे अनुदान यांचा विचार करून सुमारे 23 कोटींची वाढ करून यंदाचा अर्थसंकल्प 124 कोटींवर गेला आहे. या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी 20 कोटी 60 लाख, बांधकाम विभागासाठी 25 कोटी 14 लाख, पाटबंधारे विभागासाठी 6 कोटी 49 लाख, आरोग्य विभागासाठी 4 कोटी दोन लाख, कृषीसाठी 4 कोटी 19 लाख, पशुसंवर्धनसाठी 3 कोटी 85 लाख, समाजकल्याण विभागासाठी 6 कोटी 56 लाख रुपये, महिला व बालकल्याण विभागासाठी 7 कोटी 14 लाख आणि पाणीपुरवठा 4 कोटी 39 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. 

'डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही' : अजित पवार

या कामांसाठी वाढीव निधी
ठाणे जिल्हा परिषदेने सादर केलेल्या या अर्थसंकल्पात ठाणे जिल्ह्यात सेन्ट्रल स्कूल सुरु करण्यासह ज्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शौचालय नाहीत अथवा नादुरुस्त आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी शिक्षणला उपलब्ध करून दिला आहे. तसेच ग्रामीण भागातील कच्चे रस्ते डांबरी अथवा सिमेंटचे रस्ते करण्यावर भर देण्यात आले असून जिल्हा रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी सर्वाधिक निधी बांधकामला देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी व विद्युत कुंपणासाठी भरीव निधी देण्यात आला आहे.

ठाणे पालिकेने कोरोना नियंत्रणासाठी कसली कंबर! ॲानलाईन बेड अलोकेशन सिस्टम वेबलिंक सुरू

 

ठाणे जिल्ह्यातील विकास कामांना चालना मिळावी यावर लक्ष केंद्रित करण्यात आला आहे. सर्व खात्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात जास्त निधी देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून नाविन्यपूर्ण योजनांचा देखील यात समावेश करण्यात आला आहे. तसेच यंदाचा अर्थसंकल्प हा सर्व समावेशक आहे. 
सुभाष पवार, उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती, ठाणे जिल्हा परिषद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thane zilla parishad presents its budget of 124 crore, these departments gets more focus