esakal | मिरा-भाईंदर : वेदरशेड आणि अनधिकृत बांधकामांचा मुद्दा महासभेत गाजला
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मिरा-भाईंदर : वेदरशेड आणि अनधिकृत बांधकामांचा मुद्दा महासभेत गाजला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : मिरा-भाईंदरमधील (Mira Bhayander) वेदर शेड (Weather Shed) उभारलेल्या इमारतींना महापालिकेने (Municipal) बजावलेल्या नोटिसा (Notice)आणि अनधिकृत (illegal) बांधकामांवरील कारवाई हे दोन मुद्दे महापालिकेच्या (Municipal) आज पार पडलेल्या महासभेत चांगलेच गाजले. वेदरशेड (Weather Shed) असलेल्या इमारतींना बजावलेल्या नोटिसांवर नगरसेवकांनी (Corporate) तीव्र नाराजी व्यक्त केली; तर अनधिकृत बांधकामांना प्रभाग अधिकारी जबाबदार असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची टीका या वेळी प्रशासनावर करण्यात आली.

पालिकेकडून शहरातील वेदरशेड उभारलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या असून त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. नोटीस मिळाल्याने इमारतीमधील रहिवासी कारवाईच्या भीतीने धास्तावले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी महासभेत लक्षवेधी सूचना मांडली. शहरातील अनेक इमारती ग्रामपंचायत काळातील आहेत. बहुतांश इमारतींकडे मालकीची कागदपत्रे नाहीत. अशा परिस्थितीत प्रभाग अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची मागणी करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा मुद्दा पाटील यांनी मांडला.

हेही वाचा: वसई-विरार : अनधिकृत फेरीवाल्यांना आवरा; महापालिकेपुढे कारवाईचे आव्हान

अनधिकृत बांधकामांचा विषयदेखील या वेळी गाजला. प्रभाग अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळेच अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. नगरसेवकांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रभाग अधिकारी कारवाई करत नाहीत, अशी तक्रार बहुतांश नगरसेवकांनी केली; तर काँग्रेसचे नगरसेवक राजीव मेहरा यांनी अनधिकृत बांधकाम प्रकरणात निलंबन झालेल्या तसेच लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेल्या प्रभाग अधिकाऱ्या‍ला चक्क उपायुक्तपदावर बढती देण्यात आल्याचे या वेळी सांगितले.

हेही वाचा: 'शिक्षण आपल्या दारी'तून वंचित विद्यार्थ्यांना मिळतेय उभारी !

  • महापौरही आक्रमक

आपल्या महापौरपदाच्या काळात अनधिकृत बांधकामे खपवून घेतली जाणार नाहीत. अनधिकृत बांधकामांची जबाबदारी निश्चित करून तिचे पालन न करणाऱ्या प्रभाग अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. इमारतींना बजावण्यात आलेल्या वेदरशेडच्या नोटिसा तातडीने मागे घेण्यात याव्यात. तसेच वेदरशेडसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये, असा निर्णय महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिला आहे.

loading image
go to top