म्हणून 'ते' धावतायेत रस्त्यावर! जीवाला धोका...

म्हणून 'ते' धावतायेत रस्त्यावर! जीवाला धोका..
म्हणून 'ते' धावतायेत रस्त्यावर! जीवाला धोका..

नवी मुंबई : आरोग्याविषयी वाढत्या जागरूकतेमुळे व्यायामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, सानपाडा नोड व गावठाणात पुरेसे जॉगिंग ट्रॅक नसल्याने, परिसरातील रस्त्यांना जॉगिंग ट्रॅक स्वरूप प्राप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. सानपाडा येथील संत शिरोमणी उद्यान व मास्तर सीताराम उद्यान सोडले तर कुठेही पालिकेकडून जॉगिंग ट्रॅक उपलब्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे परिसरात जॉगिंग ट्रॅक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

जॉगिंगसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या पाहता सानपाडा परिसरातील ही उद्याने अगदीच त्रोटक ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांना शीव-पनवेल मार्ग, पाम बीच मार्ग, अंतर्गत रस्ते, रेल्वेस्थानक परिसर, पदपथ, सेवारस्त्यांवर जॉगिंग करावी लागत आहे. मात्र, या ठिकाणी भरधाव वाहनाची धडक बसून, अपघाताची दाट शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे स्वतंत्र जॉगिंग ट्रॅकसह सायकल ट्रॅकची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहर विकसित करताना प्रशासनाकडून व्यायामासाठी आवश्‍यक सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अनेक जण शरीरयष्टी बनवण्याच्या प्रयत्नात खिशाला झळ सोसत खासगी जिमची वाट धरत आहेत. तर अनेक जणांना जॉगिंगसाठी दूर जात पायपीट करावी लागत आहे.

तुर्भे विभाग कार्यालय येथे नव्याने विकसित झालेल्या संवेदना उद्यानात रबर ट्रॅक असल्याने, अनेक जण या ठिकाणी दोन ते तीन मैल पायपीट करत येतात. भविष्यात या ठिकाणी प्रवेश शुल्क आकारले जाणार असल्याने, जॉगिंग करावी तरी कुठे, असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिला आहे. तर काही नागरिक वाशी येथील मिनी सी-शोअरकडे आपला मोर्चा वळवतात. त्यात सानपाडा सेक्‍टर- ५ ते १४ पर्यंतच्या नागरिकांना दोनच उद्यानातील जॉगिंग ट्रॅक असल्याने, त्यांना हे ट्रॅक अपुरे पडत असल्याने त्यांना रस्त्यावरच जॉगिंग करावी लागत आहे.

उद्याने, मैदाने अपुरी
सानपाडा गाव व नोडमधील छोटी-मोठी उद्याने व मैदानातही व्यायामासाठी अनेकांची गर्दी होते. मात्र, या ठिकाणी व्यायामासाठी येणाऱ्यांची संख्या मागील काही वर्षांत वाढत चाललेली आहे. त्यामुळे या ठिकाणचे जॉगिंग ट्रॅक अपुरे पडत असून, लगतच्या रस्त्यांवरही लोक व्यायामासाठी उतरू लागले आहेत. परिणामी, पहाटे ५ वाजल्यापासून ते सकाळच्या ९ वाजेपर्यंत परिसरातील अनेक रस्ते व्यायामासाठी आलेल्या नागरिकांमुळे भरगच्च झालेले पाहायला मिळतात. 

सानपाडा परिसरातील उद्यानांमध्ये सकाळी मोठ्या प्रमाणात नागरिक येतात. त्या तुलनेत येथील जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे नागरिकांना पाम बीच मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर किंवा सानपाडा स्थानकाकडे जाणाऱ्या रहदारीच्या रस्त्यावर जॉगिंग करावी लागत आहे.
- सुभाष म्हात्रे, ग्रामस्थ.

सानपाडा विभागात सेक्‍टर- १० मध्ये नवीन संवेदना उद्यान उभारण्यात आले आहे. त्या ठिकाणी असलेला रबरी ट्रॅक तांत्रिकदृष्ट्या चालण्यासाठी योग्य आहे. मात्र, या ठिकाणी लवकरच प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे या उद्यानातील ट्रॅकप्रमाणे पालिकेने परिसरात जॉगिंग ट्रॅक उभारावेत.
- मंजू यादव, नागरिक.

सानपाडा येथे एकही जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅकही नाही. परिसरात मास्तर सीताराम उद्यान, संत शिरोमणी उद्यान हे एकत्रित असल्याने सकाळच्या वेळेस मुले मैदानी खेळ खेळण्यास येतात. पालिकेने त्यांचे विभाजन करावे. तसेच इतर ठिकाणी जॉगिंग ट्रक उभारावेत. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही.
- सोमनाथ वास्कर, नगरसेवक.

सकाळी उद्यानात येणाऱ्या नागरिकांची गर्दी कमी असते. सानपाडा येथील संवेदना उद्यानात जॉगिंग ट्रक उभारण्यात आला आहे. सायकल ट्रॅकबाबत सर्व्हे सुरू असून, इतर ठिकाणी जॉगिंग ट्रॅक उभारण्यास प्रशासनाच्या विचाराधीन आहे.
- मनोज पाटील, कार्यकारी अभियंता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com