लाईव्ह न्यूज

दूध उत्‍पादनात जिल्‍हा परावलंबी

दूध उत्‍पादनात जिल्‍हा परावलंबी
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १७ ः एकेकाळी दूध संपन्न असलेल्या रायगड जिल्ह्यातील दूध उत्‍पादनात मोठी घट झाली आहे. जिल्‍ह्यातील २६ लाख लोकसंख्येसाठी आवश्यक दुधापैकी ९५ टक्के दूध दुसऱ्या जिल्ह्यातून मागवावे लागते. साधारण तीन लाख लिटर दुधाची मागणी असताना, जिल्‍ह्यात केवळ एक हजार लिटर दूध उत्पादित होत आहे. मनुष्यबळाचा अभाव, पाण्याची व हिरव्या चाऱ्याच्या कमतरतेमुळे दिवसेंदिवस हे कमी प्रमाण कमी होत आहे. दूध उत्पादन घटल्‍याने रायगड जिल्ह्यातील १३४ दूध संस्थांसह दोन दूध संघ दिवाळखोरीत निघाले आहेत. परिणामी जिल्ह्यातील दूधग्राहकांना जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या विविध दूध संस्थांच्या दुधावर अवलंबून राहावे लागत आहे.
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, यासाठी सहकार तत्त्वावर चालणाऱ्या दूध संस्था स्थापन करण्यात आल्या; पण त्यातीलही १३४ दूध संस्था दिवाळखोरीत गेल्या आहेत. यापैकी अलिबाग तालुक्यातील पाच, पेणमधील १०, पनवेल १९, उरण चार, कर्जत १५, खालापूर पाच, सुधागड २०, रोहा आठ, मुरूड दोन, माणगाव दहा, महाड २६, म्हसळा एक आणि पोलादपूर तालुक्यातील नऊ, तर पेण तालुक्यातील जिल्हा दूध संघ आणि पनवेल तालुक्यातील तालुका दूध संघ दिवाळखोरीत निघाला आहे. सद्यःस्थितीत २१ दूध संस्था सुरू असल्याचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) या कार्यालयाकडून सांगण्यात आले. या २१ दूध संस्थापैकी पेण, पनवेल, खालापूर, माणगाव तालुक्यात प्रत्येकी एक, अलिबाग व महाड तालुक्यात प्रत्येकी दोन, कर्जत व रोहा तालुक्यात प्रत्येकी तीन, तर सुधागड तालुक्यात सात दूध संस्था असल्या, तरी जिल्ह्यात प्रत्यक्षात नऊ संस्थाच दूध संकलनाचे प्रत्यक्ष काम करीत आहेत.
जिल्ह्यात दररोज तीन लाख १६ हजार २४७ लिटर दुधाची गरज असताना प्रत्यक्षात एक लाख ७४ हजार ६९८.५ दुधाचे उत्पादन होत असून, एक लाख ४१ हजार ५४८.५ लिटर्स दुधाची जिल्ह्याला अजून गरज आहे, मात्र सरकारने त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा अत्‍यल्‍प आहे. शेतीला जोडधंदा म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काही वर्षांपूर्वी गायी, म्हशी पाळण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांकडून दूध संकलनासाठी सरकारने महाड आणि खोपोली येथे दोन सरकारी दूध योजना सुरू केल्या होत्या, मात्र ही संस्थाही बंद पडली आहे.

दुग्ध विकास कार्यालयाचे विलीनीकरण
सध्या जिल्हा दुग्ध विकास विभागात पाच कर्मचारीच कार्यरत आहेत. दुग्ध विकासाला जिल्ह्यात कमी संधी असल्याने या विभागाचे पशुसंवर्धन विभागात विलीनीकरण केले जाणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने अध्यादेश काढला असून, टप्प्याटप्प्याने विलीनीकरण केले जात आहे. त्यामुळे हा दुग्ध विकास विभाग काही दिवसांनी इतिहासजमा होणार आहे. सध्या या विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आलेला आहे.


मुंबईसारखी मोठी बाजारपेठ
नवी मुंबई परिसरात दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत. या ठिकाणी जादा उत्पादित होणाऱ्या दुधावर प्रक्रिया केली जाते. त्याचबरोबर मुंबईसारखी मोठी बाजारपेठ जवळच असल्याने वाहतुकीचा खर्च कमी आहे. यासाठी रायगड जिल्ह्यात दुग्ध विकासासाठी खूप चांगली संधी होती, परंतु येथील स्थानिकांचे शेतीबरोबर दुग्ध व्यवसायाकडेही दुर्लक्ष झाले. सध्या फक्त खालापूर आणि महाड येथे दोन संस्था कार्यरत आहेत. त्यांच्याही सदस्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.

पाणीटंचाईचा परिणाम
दुग्ध व्यवसायासाठी हिरव्या चाऱ्याची जास्त गरज असते. जिल्ह्यातील चार महिने पाणीटंचाईचे असल्याने या कालावधीत जनावरांनाही टंचाई जाणवत असते. या चार महिन्यांत दुधाचे उत्पन्न कमी होत असल्याने ते शेतकऱ्यांना न परवडण्यासारखे असते. यावर मात करत काही गावातील शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय कार्यरत ठेवला आहे; परंतु या व्यवसायातून येथील पाच टक्केही मागणी पूर्ण होऊ शकत नाही.

जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाचा विकास होत नाही, यास विविध कारणे आहेत. यात महत्त्वाचे म्हणजे हिरवा चारा असून, उन्हाळ्यात तो मिळेनासा होतो. येथे सुरुवातीच्या कालावधीत चांगल्या संस्था कार्यरत होत्या, परंतु त्या टप्प्याटप्प्याने बंद पडत गेल्या. आता काही मोजक्याच संस्था दुधाचे संकलन करतात. दररोज दुधाची मागणी वाढत असताना येथील दुधाचे उत्पादन घटत चालले आहे.
- सुदर्शन पाडावे, दुग्ध विकास अधिकारी
-------------

दुधाचा तुटवडा
अलिबाग/-22236
पनवेल/-94618
पेण/-13801
कर्जत/-2857
रोहा/-12124
खालापूर/-10463
माणगांग/-6623
सुधागड/-429.5
मुरुड/-6541.5
पोलादपूर/जादा 990
महाड/-15384
उरण/-18021
तळा/-2354
श्रीवर्धन/-3937
म्हसळा/-2804.5
एकूण / 195834.5

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com