कोट्यवधी खर्च करूनही पुन्हा जैसे थे परिस्थिती

सकाळ वृत्तसेवा
Monday, 17 February 2020

दरवर्षी पालिकेकडून स्वच्छ भारत अभियानावर करोडो रुपये खर्च केले जात आहेत; मात्र प्रत्यक्षात हा खर्च व्यर्थ जात असल्याचे निदर्शनास येत आहे. दिल्लीतील केंद्रीय पथक जानेवारी महिन्यात पाहणी करून गेल्यानंतर शहरात पुन्हा जैसे थे परिस्थिती होण्यास सुरुवात झाली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेला स्वच्छ भारत अभियानामध्ये सलग तीन वर्षे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या अभियानासाठी दरवर्षी पालिकेकडून करोडो रुपये खर्च केले जात आहेत; मात्र प्रत्यक्षात या मोहिमेवरील खर्च व्यर्थ जात असल्याचे निदर्शनास येत आहे. दिल्लीतील केंद्रीय पथक जानेवारी महिन्यात पाहणी करून गेल्यानंतर शहरात पुन्हा जैसे थे परिस्थिती होण्यास सुरुवात झाली आहे. चौकाचौकातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने भले मोठे ढीग साचल्याचे दिसून येत आहे; तर स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाली आहे.

ही बातमी वाचली का? त्या फिलीपाईन्सच्या नागरिकाला कोरोना नाही

स्वच्छता अभियानादरम्यान पालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. परिणामी, घनकचरा व्यवस्थापनामध्ये पालिकेला देशात प्रथम क्रमांक मिळाला; मात्र हे अभियान संपल्यानंतर लोकसहभाग फक्त नावापुरताच असून, नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करण्यातही सहकार्य करत नसल्याचे दिसून येत आहे. एकाच डब्यात ओला व सुका दोन्ही प्रकारचा कचरा टाकला जात आहे. पालिकेकडून भिंती रंगवण्यात आल्या होत्या. या भिंतींवर आता पानाच्या पिचकाऱ्यांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत; तर कचरा वेळेवर उचलण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे चौकाचौकांत कचऱ्याचे ढीग लागले आहेत. 

ही बातमी वाचली का? अनधिकृत नर्सिंग होमवर विधीमंडळात लक्षवेधी

हॉटेल व्यावसायिक रात्रीच्या वेळी बिनधास्तपणे कचराकुंडीच्या बाहेर कचरा टाकत आहेत. झोपडपट्टी भागातील इलठणपाडा, विष्णू नगर, चिंचपाडा, यादवनगर, तुर्भे, इंदिरानगरमध्ये कचऱ्याची पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आहे. स्वच्छता अभियानांतर्गत पालिकेच्या शाळा व उद्यानांमध्ये कंपोस्ट पीट तयार करण्यात आले होते. त्या कंपोस्ट पीटचा वापर केला जात नसून, तिचे रूपांतर आता कचरा कुंडीत झाले आहे. ऐरोली येथील विवेकानंद उद्यानामध्ये फक्त नावापुरते खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. स्वच्छता अभियानांतर्गत शहरात मोठ्या प्रमाणात नवीन प्रसाधनगृहे उभारण्यात आली, परंतु देखभालीसाठी यंत्रणा नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अर्थात, केवळ स्वच्छता पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार असेल तेव्हा स्वच्छतेवर लक्ष दिले जाते. स्पर्धा संपताच पुढे पाठ मागे सपाट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ही बातमी वाचली का? मुंबई यंदाही तुंबणार

हागणदारीमुक्तीचा दावा फोल
सकाळच्या वेळी पालिकेचे कर्मचारी हागणदारीमुक्तीसाठी फिरायचे; मात्र आता अभियान संपताच पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालिकेचा दावा फोल ठरला असून, डोंगर भागातील मुख्यतः यादव नगर, विष्णूनगर या भागांत नागरिक बिनधास्तपणे उघड्यावर शौचास बसत असल्याचे दिसून येत आहे.

स्वच्छतेबाबतची स्थिती
- कचरा वेळेवर उचलला जात नाही.
- स्वच्छतेचा संदेश लिहिलेल्या ठिकाणी कचरा टाकला जात आहे.
- उद्यान व शाळेतील कंपोस्ट पीटची दुरवस्था.
- ओला व सुका कचरा वेगळा करण्याकडे दुर्लक्ष.
- अनेक ठिकाणी स्वच्छतागृह बंद आहेत.
- स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी यंत्रणाच उपलब्ध नाही.
- रस्त्यांच्या साफसफाईकडे दुर्लक्ष होत असल्याने सर्वत्र अस्वच्छता पसरली आहे.
 
स्वच्छ भारत अभियान सुरू असताना अस्वच्छ रस्तेदेखील स्वच्छ केले जातात. स्वच्छतागृहांचीदेखील चोख साफसफाई ठेवण्यात येते; मात्र स्वच्छ भारतची दिल्लीचे केंद्रीय पथक पाहणी करून जाताच पुन्हा आहे तशीच परिस्थिती होत आहे.
- अतुल आवारी पाटील, नागरिक.

स्वच्छता अभियानात ज्या प्रकारे शहर स्वच्छ ठेवले जात होते, त्याचप्रमाणे वर्षभर स्वच्छता ठेवण्यात येईल. सकाळच्या वेळी हागणदारीमुक्तीसाठी गुड मॉर्निंग पथक सक्रिय करण्यात येईल; नागरिकांनीदेखील शहर स्वच्छ ठेवणे आवश्‍यक असून, स्वच्छतेसाठी सहकार्य करावे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trash pile on the streets of Navi Mumbai!