अबब...! पोटात निघालं पावणेदोन कोटींचं 'हे' घबाड!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

परदेशी नागरिकाच्या  पोटात एक्‍स-रे, सोनोग्राफीमध्ये ५६ कॅप्सूल असल्याचे उघड

मुंबई ः अमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या ४३ वर्षीय परदेशी नागरिकाच्या पोटातून कोकेन भरलेल्या ५६ कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. जे. जे. रुग्णालयातील डॉक्‍टरांनी पाच दिवस प्रयत्न करून त्याच्या पोटातून काढलेल्या कोकेनची किंमत पावणेदोन कोटी रुपये असल्याचे हवाई गुप्तवार्ता विभागाच्या (एआययू) अधिकाऱ्यांनी सांगितले.

'पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांचा दिला राजीनामा'; भाजपला मोठा शॉक...

अलेक्‍झांडर डिसोझा (४३) हा परदेशी नागरिक इथिओपियन एअरलाईनच्या विमानाने आदिस अबाबाहून मुंबईत आला होता. एआययूला मिळालेल्या माहितीवरून मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या आठवड्यात त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती.

एवढ्याशा वयातही दिली मृत्यूशी झुंज

जे. जे. रुग्णालयात त्याचा एक्‍स-रे काढण्यात आला व सोनोग्राफी करण्यात आली. त्या वेळी त्याच्या पोटात मोठ्या प्रमाणात कॅप्सूल असल्याचे उघड झाले होते. डॉक्‍टरांनी पाच दिवस प्रयत्न करून त्याच्या पोटातून ५६ कॅप्सूल काढल्या. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या ६०० ग्रॅम कोकेनची किंमत एक कोटी ८३ लाख रुपये असल्याचे एआययूच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अमेरिकेपर्यंत धागेदोरे पोहोचलेल्या या प्रकरणात मोठ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा हात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

घेणं ना देणं..! नागरिकांना बसतोय तीन हजारांचा भुर्दंड...

५०० डॉलरचे प्रलोभन
ब्राझीलमधील साओ पावलो येथील एका व्यक्तीने मुंबईत कोकेन पोहोचवण्यासाठी ५०० अमेरिकन डॉलर (सुमारे ३६ हजार रुपये) देण्याचे प्रलोभन दाखवले होते. आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे हे काम करण्यास आपण होकार दिला, असे अलेक्‍झांडर डिसोझा याने चौकशीदरम्यान कबूल केले. टुरिस्ट व्हिसावर भारतात आलेल्या डिसोझाचा प्रवासखर्च या व्यक्तीनेच केला होता. या माहितीवरून पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two billion cocaine in the stomach