#CAA_NRC संदर्भात उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळावा - अबू आझमी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 February 2020

मुंबईत सीएएविरोधात पुकारण्यात आलेल्या महामोर्चाला 65 संघटना सहभागी झाल्या होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महाविकास आघाडीचे नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते.

मुंबई : मुंबईत सीएएविरोधात पुकारण्यात आलेल्या महामोर्चाला मुंबई, ठाणे भिवंडी आणि अन्य परिसरातून आझाद मैदानात हजारो आंदोलकांनी शनिवारी धडक दिली. जवळपास 65 संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह महाविकास आघाडीचे नेतेही या मोर्चात सहभागी झाले होते. प्रचंड गर्दीमुळे आझाद मैदान आणि पालिका मुख्यालय परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. आंदोलकांच्या गर्दीमुळे वाहतूकीवर ही परिणाम झाला.

कर्मचाऱ्याला निलंबित केल्यामुळे पालिकेला 48 लाखाचा फटका

सीएए, एनआरसीविरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानात गेल्याच आठवडयात या कायद्याच्या समर्थनासाठी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठकारे यांनी भव्य मोर्चा काढला होता. यावेळी राज्यभरातून हजारो हजारो मनसे कार्यकर्ते या मोर्चात सामील झाले होते. त्या पाठोपाठ आठ दिवसाच्या आतच पुन्हा 65 संघटनांनी आझाद मैदानात केंद्र सरकारच्या विरोधात मोर्चा काढत तीव्र आंदोलन केले. संविधान बचाव आणि भारत बचावच्या नाऱ्यांनी आझाद मैदान परिसर दुमदुमुन गेला होता. या आंदोलनात सपाच्या अबू आझमीसह वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.

महत्वाचं - मोबाईल कॉलिंग 25 टक्क्यांनी महागणार

एनआरसीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळावा असे आवाहन अबू आझमी यांनी केले. संविधान वाचले तरच देश वाचेल असे आंदोलकांचे म्हणणे आहे. देश भरात सीएए, एनआरसी आणि एनआरपीच्या बाबत जे आंदोनल सुरू आहे, त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असून केंद्र सरकारच्या हुकूमशाहीला विरोध म्हणून महामोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे.

 

आझाद मैदान आणि अन्य परिसरात पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, गर्दीला नियंत्रण करता करता पोलीसांची दमछाक झाल्याचे दिसून येत होते. महिला आणि पुरूषांना वेगवेगळया रांगेतून पुढे जाण्यासाठी आंदोलकांना विनवणी करावी लागत होती. काही आंदोलक पोस्टर्स आणि बॅनर्स घेउन मध्येच उभे राहात होते. परंतु त्यांना बाजुला करण्यासाठी पोलीसांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray should be followed in the promise about #CAA_NRC - Abu Azmi