चौदा वर्षांपूर्वी लोकलमध्ये त्यांचे पाकिट हरवले; अन् लॉकडाऊनमध्ये पोलिसांचा फोन आला की...

संजय घारपुरे
Sunday, 9 August 2020

मुंबईतील लोकलच्या गर्दीत तर पाकिट मारण्याच्या घटना तर नेहमीच होतात. अनेक पाकिटमारांची कमाई तर त्यावरच होते. त्यामुळे रेल्वेत हरवलेले पाकिट पुन्हा सापडणे दुरापास्तच समजले जाते.

मुंबई : रेल्वेत पाकिट मारले गेले किंवा हरवले तर ते मिळण्याची शक्यता जवळपास नसतेच. अनेकजणांना याचा अनुभवही आला असेल. मुंबईतील लोकलच्या गर्दीत तर पाकिट मारण्याच्या घटना तर नेहमीच होतात. अनेक पाकिटमारांची कमाई तर त्यावरच होते. त्यामुळे रेल्वेत हरवलेले पाकिट पुन्हा सापडणे दुरापास्तच समजले जाते. पण चौदा वर्षापूर्वी हरवलेले पाकिट मिळत असेल, तर कोणाचेही कधीही हरवलेले पाकिट मिळवण्याची नक्कीच आशा सोडता येणार नाही. अक्षरशः एखाद्या कहाणीत वाटणारी घटना मुंबईत प्रत्यक्ष घडली आहे. 

गणेशोत्सवासाठी मुंबईतून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी 'ही' आनंदाची बातमी, नक्की वाचा

हेमंत पडलकर यांचे पाकिट काही वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल लोकलमध्ये हरवले. अगदी नेमके सांगायचे झाले तर 2006 मध्ये. आता हे केवळ पाकिट मिळाले नाही, तर त्यावेळी चोरी झालेले सर्व पैसेही परत मिळणार आहेत, पोलिसांनी हे सांगितल्यावर पडलकरांचा विश्वासच बसला नाही. पडलकरांना एप्रिलमध्ये रेल्वे पोलिसांकडून फोन आला. त्यावेळी त्यांना तुमचे पाकिट मिळाले असल्याचे सांगण्यात आले, पण कोरोना महामारीमुळे अमलात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना पाकिट ताब्यात घेण्यासाठी जाता आले नाही. पनवेलला राहत असलेल्या पडलकर नुकतेच वाशीतील रेल्वे पोलिसांकडे गेले, त्यावेळी त्यांना त्यांच्या पाकिटातील काही पैसे परत देण्यात आले.

मुंबईकर, जाणून घ्या तुमच्या शहरातील कोरोनाची परिस्थिती

माझे वॉलेट हरवले, त्यावेळी त्यात नऊशे रुपये होते. त्यात पाचशेची एक नोट होती. नोटबंदीच्यावेळी ती बाद झाली होती. पोलिसांनी मला तीनशे रुपये दिले. त्यांनी शंभर रुपये स्टॅम्प पेपरच्या कामासाठी घेतले. पाचशे रुपयांची नवी नोट देण्यात येणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ती परत मिळणार आहे, असे पडलकर यांनी सांगितले. 

राज्यातील इतर 300 गडकोट-किल्ले संवर्धनाची जबाबदारी कोणाची? वाचा कोणत्या संघटनेने विचारला हा महत्वपुर्ण सवाल

पडलकर रेल्वे पोलिसांकडे पाकिट परत घेण्यासाठी गेले, त्यावेळी तेथील कार्यालयात अनेक जण आपली चोरीस गेलेली पाकिटे परत मिळवण्यासाठी आले होते. त्या पाकिटात अनेक बाद झालेल्या नोटा होत्या. आम्हा सर्वांना ही पाकिटे कुठे मिळाली हा त्यांच्यासमोर प्रश्न होता, असे पडलकर यांनी सांगितले. आम्हा सर्वांना पैशासह पाकिट मिळाल्याचा खूप आनंद झाला होता, असेही त्यांनी सांगितले. पडलकर यांचे पाकिट चोरलेल्यास आम्ही काही दिवसांपूर्वी पकडले होते. त्यांच्याकडून पाकिट जप्त केले. त्यांच्या पाकिटात पैसे तसेच होते. त्यांना त्यांचे पाचशे रुपयेही बदलून देणार आहोत, असे पोलिसांनी सांगितले.
---
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wallet stolen in csmt panvel 2006 and police informed them it is recovered