"पोलिस दलाचा सार्थ अभिमान, पोलिसांच्या सक्षमीकरणासाठी कटीबद्ध"; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हुतात्मा दालनाचे उद्घाटन

अनिश पाटील
Thursday, 26 November 2020

स्वतःच्या कुटुंबातील, घरातील सुख, दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल होतात, सण, उत्सव असो वा सभा असो, जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलिस चोवीस तास कर्तव्य बजावतात, अशा पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे.

मुंबई, ता. 26 : स्वतःच्या कुटुंबातील, घरातील सुख, दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल होतात, सण, उत्सव असो वा सभा असो, जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलिस चोवीस तास कर्तव्य बजावतात, अशा पोलिसांचा मला सार्थ अभिमान आहे. पोलिस दल सर्व परिस्थितीत पोलिस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार सदैव कटिबद्ध असल्याच्या भावना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या. शहीदांच्या कुटुंबियांच्या हस्ते हुतात्मा दालनाचे औपचारीक उद्‌घाटन करण्यात आले.

महाराष्ट्र पोलिस महासंचालनालयात आयोजित हुतात्मा दालन उद्‌घाटन आणि कॉफी टेबल बुक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते.  शौर्याला वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. 26 नोव्हेंबर हा शौर्यदिन. या दिनी शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना वंदन व नतमस्तक. हा दिवस आपण विसरु शकत नाही. अगदी नक्षलवादी अतिरेक्यांपासून ते भुरट्या चोरांपासून सर्वांना पकडणारा हा आमचा पोलिस एक महत्वाचा घटक आहे. तो सुदृढ राहिलाच पाहिजे, त्याला सुदृढ ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढे अतिरेकी महाराष्ट्र, मुंबईवर हल्ला काय पण मुंबईचे नाव पण घेऊ शकणार नाहीत, त्यांना धडकी भरेल असे आपण पोलिस दलाचे भक्कम सक्षमीकरण करु, त्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

 

महत्त्वाची बातमी : नवी मुंबईत कोरोनाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार, प्रवीण दरेकरांचे गंभीर आरोप

पोलिसांची कामे ही जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याकरिता अशा हुतात्मा दालनाची संकल्पना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच महाराष्ट्रात सर्वत्र राबविण्यात यावी, असेही यावेळी ठाकरे यांनी म्हटले.

या कार्यक्रमाला उपस्थित गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही हुतात्मा दालनाचे उद्‌घाटन शहीद पोलिस बांधवांच्या वीर पत्नी व कुटुंबियांकडून होत आहे, ही बाब आनंदाची बाब आहे, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. नक्षलवादी, अतिरेकी, गुन्हेगार, समाजकंटक अशा वेगवेगळ्या समाजविघातक शक्तींशी सामना करुन आपले पोलिस कारवाई करत असतात. तसेच विविध आपत्ती काळातही पोलिस कार्यरत असतो. सध्याच्या कोरोना काळात तर पोलिस चोवीस तास कार्यरत आहेत. कोरोना विरुद्धाची लढाई अजून सुरु आहे. ही लढाई अनिश्चित काल आहे. पण आपले पोलिसदल हिंमत हरलेले नाहीत. महाराष्ट्र पोलिसांचे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. त्यांचे कर्तव्यावरील कौशल्य, चाणक्षबुद्धी, शिस्त याचे सर्वत्र कौतुक असते.

महत्त्वाची बातमी : २०१९ विधानसभा निकालांनंतर राष्ट्रवादीचे बडे नेते शरद पवारांचा मेसेज घेऊन वर्षावर गेले होते ? नवाब मलिकांनी दिलं उत्तर

यावेळी आपल्या प्रास्ताविकातून पोलिस महासंचालक सुबोध जायस्वाल यांनी हुतात्मा दालन व अतुल्य हिंमत या कॉफीटेबल बुक संदर्भात माहिती दिली. माजी पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सुरु केलेल्या हुतात्मा दालन निर्मितीची परिपूर्ती आज झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

सध्या हे दालन रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याचे नियोजन असून भविष्यात ते सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करुन दिले जाईल. त्यामुळे पोलिस आणि जनता यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

शहीदांचे कुटुंबिय विनीता अशोक कामटे,  स्मिता विजय साळसकर, तारा ओंबळे, मानसी शिंदे तसेच जिजाबाई आलम यांच्या हस्ते हुतात्मा दालनाचे औपचारीक उद्‌घाटन करण्यात आले. 

( संपादन - सुमित बागुल )

we are committed to empower our police forces says CM uddhav thackeray


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we are committed to empower our police forces says CM uddhav thackeray