मुंबईत आर्मी आणणार नाही हे तर केलं स्पष्ट, पण मुंबईत चौथा लॉकडाऊन लागणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केल्यास यातून लवकर सुटका होईल...

मुंबई :  महाराष्ट्र हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट असून मुंबईत लष्कराची गरज नाही. येथील प्रत्येक नागरिक हाच जवान आहे. त्यामुळे मुंबईत लष्कर आणणार किंवा, लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तुंची सर्व दुकाने बंद होणार या अफवा असून लोकांनी यावर विश्वास ठेऊ नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.  तसेच ते पुढे म्हणाले की, लोकडाऊन संपवणे आपल्या हातात आहे. आपण जेवढी शिस्त पाळु, संयम ठेऊन वागू तेवढी आपल्याला कोरोनाची साखळी तोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केले तसेच सहकार्य यापुढे ही करावे, शिस्त पाळावी आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधला. 

मृतदेह शवागारात नव्हता म्हणून मित्राने विचारपूस केली, तर डॉक्टर म्हणाले तो तर...

आरोग्य सुविधेत वाढ :

कोरोनाचे संकट मोठे होत आहे तशा आपण आरोग्य सुविधाही वाढवत आहोत, रेसकोर्स मैदान, वांद्रा-कुर्ला संकुल, गोरेगावचे एक्झिबिशन सेंटर येथे आपण रुग्णांच्या विलगीकरणाची, उपचाराची व्यवस्था करत आहोत.  हे करतांना तोंडावर येऊन पोहोचलेल्या पावसाचा ही विचार करावा लागत आहे. ऐनवेळी धावपळ होऊ नये यासाठी  रेल्वे, बीपीटी आणि लष्कराची रुग्णालये वापरण्याची परवानगी आपण केंद्र शासनाकडे मागितली आहे. त्यास केंद्राने मान्यता ही दिली आहे.

सध्या सगळी यंत्रणा तणावाखाली आहे. पोलीस, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार हे आपल्यासाठी लढत आहेत, आजारी पडत आहेत, दुर्देवाने काही पोलीसांचे मृत्यू देखील झाले आहेत. ते आजारी पडल्यानंतर त्यांना बाजूला करणे चुकीचे आहे, त्यांना थोड्या काळासाठी विश्रांती मिळावी म्हणून, पोलीसांना आलेला थकवा जावा म्हणून केंद्र सरकारकडे अतिरिक्त मनुष्यबळ देण्याची विनंती आपण करत आहोत.

सावधान! सायबर हल्ल्यांमध्ये दुपटीने वाढ; सतर्क राहण्याचे आवाहन

हॉस्पिटलमध्ये गलथानपणा चालणार नाही 

हॉस्पीटलधील गलथानपणा अजिबात सहन केला जाणार नाही असा इशारा देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, पोलीस, डॉक्टर हे आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्यावर हल्ला करू नका, कडक कारवाई होईल. पण हे करतांना डॉक्टरांनीही गलथानपणे काम करू नये, कारवाईची वेळ आणू नये. टास्कफोर्स, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, आपल्यासोबत आहेत,  ही लढाई आपण एकमेकांच्या सहकार्याने सक्षमपणे लढत आहोत. तरी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. आयुष, होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी पुढे येऊन  सर्वसामान्य रुग्णांना सेवा देण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

चौथ्या लॉकडाऊनबद्दल सूचक विधान :

रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये राज्याची विभागणी केली आहे रेड झोनमधील नियम अधिक कडक करतांना इतरत्र काही अटी आणि शर्थीच्या अधीन राहून आपण व्यवहार सुरु केले आहेत. लॉकडाऊन हे गतिरोधक आहे, त्यामुळे गती कमी झाली परंतू साखळी तोडण्यात अजून यश आले नाही. अजून काही ठिकाणी लोक शिस्त पाळताना दिसत नाहीत, तसे होऊ नये, आपल्याला कोरोनाची साखळी तोडायची आहे. आपण सर्व मिळून एकदाच कडक बंधने पाळू आणि ही साखळी तोडू असेही मुख्यमंत्री म्हणाले.

what CM uddhav thackeray spoke about army in mumbai and fourth lockdown

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what CM uddhav thackeray spoke about army in mumbai and fourth lockdown