"मेगननं पाठवलेल्या भेटीत रोख रक्कम आहे, तुम्हाला अटक करण्यात येईल" ; 53 वर्षीय महिलेला 'इतक्या' लाखांचा गंडा...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

एका 53 वर्षीय महिलेची फेसबुकवरुन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं महिलेला 12 लाख 71 हजारांचा गंडा लावला आहे.

मुंबई- एका 53 वर्षीय महिलेची फेसबुकवरुन फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमध्ये असलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं महिलेला 12 लाख 71 हजारांचा गंडा लावला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने वाळकेश्वर येथील रहिवासी असलेल्या महिलेकडे पैशाची मागणी केली. लंडनहून पैसे आणि काही महागडी भेटवस्तू पाठवण्याची बहाण्यानं त्यानं तिच्याकडे पैसे मागितले. या घटनेनंतर सदर महिलेनं गावदेवी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं की, मे महिन्यात केल्विन मेगन नावाच्या व्यक्तीनं मला सोशल नेटवर्किंग साइटवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानं माझ्या गप्पा मारण्यास सुरुवात केली आणि काही दिवस झाल्यानंतर आम्ही फोन नंबरची देवाण-घेवाण केली. 

जिवंत असताना बेड नाही! अन् मेल्यानंतर स्मशानात जागा नाही; मृतदेहांची हेळसांड सुरूच!

एका पोलिस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने त्याच्या प्रोफाइल फोटोमध्ये पायलटचा गणवेश घातला होता. जेणेकरुन त्या महिलेला वाटेल की तो पायलट आहे. दोघांनीही एकमेकांचे काही फोटोज शेअर केलेत. मेगननं केवळ त्याच्या गणवेशातले फोटो शेअर केले, असं पोलिसांनी सांगितलं. 

या महिलेने पोलिसांना सांगितले की, मेगननं मला सांगितलं की त्याचं माझ्यावर प्रेम असून तो माझ्याची लग्न करण्याचा विचार करत होता. तिने पुढे पोलिसांना सांगितले की, तुला भेटू शकत नसल्यानं 1 जूनला तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी भेट पाठवली असल्याचं त्यानं मला सांगितलं.

1 जूनला तिला एका महिलेचा फोन आला, तिनं स्वत:ची ओळख जयंती वर्मा अशी सांगितली. त्या महिलेनं आपण दिल्ली विमानतळावर काम करत असल्याचं म्हटलं. तिने केल्विन मेगनकडून तुमच्या नावानं भेट आली असल्याचं सांगितलं. त्या महिलेनं प्रोसेसिंग फी म्हणून माझ्याकडे 37,850 रुपये मागितले. 

मोठी बातमी - पुन्हा शरद पवार उद्धव ठाकरेंची घेणार भेट, चर्चेस कारण की...

तक्रारदार महिलेनं प्रोसेसिंग फी ट्रान्सफर केली. त्यानंतर वर्मा या महिलेनं वेगवेगळ्या पद्धतीनं तिच्याकडून 12.71 लाख रुपये दंड देण्यास सांगितलं. मेगननं पाठवलेल्या भेटीत रोख रक्कम असल्यानं तुम्हाला अटक करण्यात येईल अशी धमकी वर्मा हिनं तक्रारदार महिलेला दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

11 जूनला वर्माने महिलेला आणखी दंड भरण्यास सांगितले तेव्हा तिला काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं आणि तिनं पोलिसांशी संपर्क साधला. तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरु केली असून फसवणूक आणि तोतयागिरीचा गुन्हा दाखल केला.

Woman from mumbai Duped Of Rs 12.71 Lakh By Unknown Person On Facebook


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman from mumbai Duped Of Rs 12.71 Lakh By Unknown Person On Facebook