कट्ट्या-कट्ट्यावर "व्हॅलेंटाइन डे'ची चर्चा; काय देऊ ...यार तिला!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

प्रेमाचा दिवस म्हणून ओळख बनलेल्या "व्हॅलेंटाइन डे'चे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच वेध लागले आहेत. महाविद्यालयांसह प्रत्येक कट्ट्यावर सध्या याबाबत चर्चा ऐकावयास मिळत आहे.

नवी मुंबई : प्रेमाचा दिवस म्हणून ओळख बनलेल्या "व्हॅलेंटाइन डे'चे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच वेध लागले आहेत. महाविद्यालयांसह प्रत्येक कट्ट्यावर सध्या याबाबत चर्चा ऐकावयास मिळत आहे. तरुणाई सध्या "व्हॅलेंटाइन डे'मय झाली असल्याचे पाहायला मिळत आहे; मात्र आता केवळ तरुणांपुरतेच मर्यादित राहिलेले "व्हॅलेंटाइन डे'चे स्वरूप बदलत चालले आहे. 

ही बातमी वाचली का? नवी मुंबईकरांनो... केव्हाही पडू शकता आगीच्या भक्ष्यस्थानी!

प्रेमाची व्याख्या बदलल्याने तरुणाईच नाही, तर प्रत्येक नात्यातील प्रेम या आठवडाभरात व्यक्त केले जाते. मग ते प्रेयसीचे असो वा एका मुलाला आपल्या आईबद्दल वाटणारे प्रेम असो. प्रत्येक वयातील आणि नात्यातील प्रेम या सात दिवसांच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे. 14 फेब्रुवारीला असणाऱ्या "व्हॅलेंटाइन डे'च्या सात दिवस आधीपासून सुरू असणारे सर्व दिवस साजरे केले जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने समाज माध्यमांवर या दिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पारंपरिक भेटकार्डचा पर्याय नाकारत व्हॉटसऍप, फेसबुक, ट्विटर आणि अन्य संदेशांचा पर्याय तरुणांनी स्वीकारला आहे. वर्षभरात प्रियजनांसोबत साजरे केलेले काही खास क्षण, चित्रफिती समाजमाध्यमांद्वारे प्रसारित केल्या जात आहेत. मित्र-मैत्रिणींनी दिलेल्या भेटवस्तूंसोबत सेल्फी काढून, स्वत:च्या आवडीचे किवा गायलेले गाणे त्या प्रियजनांना ऐकवले जात असून, त्या त्या दिवसानुसार प्रत्येक जण दररोज स्टेटस, फोटो आणि आयकॉनही बदलत आहेत. ई-मेलच्या माध्यमातूनदेखील शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 

ही बातमी वाचली का? गणेश नाईकांना मोठा धक्का; कट्टर समर्थक सोडतायेत साथ...

ऑनलाईन खरेदीला बहर 
ऑनलाईन खरेदीद्वारे भेटवस्तूंचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत. नवनवीन संकल्पनांतून साकारलेल्या विविध भेटवस्तू खरेदी करण्यात वाचणारा वेळ, विविध सवलतींमुळे ऑनलाईन खरेदीच्या पर्यायाला तरुणांची अधिक पसंती मिळत आहे. ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून भेटवस्तूंमध्ये वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. विविध भेटवस्तूंच्या किमतींमध्ये 50 ते 60 टक्केपर्यंत सूट देण्यात आली असून, वेगवेगळी सुगंधी अत्तरे, आकर्षक कपडे, पिशव्या, गळ्यातील साखळ्या आदी वस्तू उपलब्ध आहेत. 

ही बातमी वाचली का? आझाद मैदानात भगवे चैतन्य

चिनी बनावटीच्या भेटवस्तूंची चलती 
इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, खेळणी, मोबाईल अशा अनेकविध उत्पादनांमध्ये चिनी वस्तूंनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले असून, भेटवस्तूंमध्येदेखील या वस्तूंचा वरचष्मा आहे. साखळ्या, प्रेमाचा संदेश लिहिलेले छायाचित्र, नाचणारे जोडपे, झोपाळ्यावर निवांत बसून गप्पा मारणारे प्रेमीयुगुल अशा अनेकविध भेटवस्तू यात उपलब्ध आहेत. यातील बहुतांश आकर्षक वस्तू सामान्य प्रेमींच्या खिशाला परवडणाऱ्या असल्यामुळे त्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे, असे विक्रेत्यांनी सागितले. 

ही बातमी वाचली का? संरक्षक कठड्यालाच कारची धडक

ऑनलाईन वस्तू स्वस्तात मिळत असल्यामुळे त्या ठिकाणी खरेदीसाठी भेटवस्तूंची पाहणी करत आहे. यात विविध पर्याय उपलब्ध असून, शोभेच्या वस्तूंपेक्षा दैनंदिन वापरातील वस्तू खरेदी करणार आहे. 
प्रतीक कुपले, विद्यार्थी. 

बाजारात सध्या साखळ्या, प्रेमाचा संदेश लिहिलेली छायाचित्रे, नाचणारे जोडपे, झोपाळ्यावर निवांत बसून गप्पा मारणारे प्रेमीयुगुल अशा चिनी बनावटीच्या अनेकविध भेटवस्तू उपलब्ध आहेत. या चिनी बनावटीच्या वस्तू सामान्य प्रेमींच्या खिशाला परवडणाऱ्या असल्यामुळे त्यांना ग्राहकांकडून मोठी मागणी आहे. 
- बाबूलाल अग्रवाल, विक्रेता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To the youngster "Valentine's Day Obsession!