नवी मुंबईत 'यांचा' धुमाकूळ; मुलींच्या मनात धडकी...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 February 2020

वाशी येथील मिनी सी-शोअर येथे महाविद्यालयीन विद्यार्थी व प्रेमी युगुलांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते; मात्र काही उनाड, टपोरी मुले महाविद्यालयीन युवतींवर छाप मारण्यासाठी दुचाकीद्वारे स्टंटबाजी करतात. या स्टंटबाजांमुळे रस्त्यावर किरकोळ अपघातदेखील घडत असून, रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांसोबत नेहमीच खटके उडत असल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई : वाशी येथील मिनी सी-शोअर येथे महाविद्यालयीन विद्यार्थी व प्रेमी युगुलांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते; मात्र काही उनाड, टपोरी मुले महाविद्यालयीन युवतींवर छाप मारण्यासाठी दुचाकीद्वारे स्टंटबाजी करतात. या स्टंटबाजांमुळे रस्त्यावर किरकोळ अपघातदेखील घडत असून, रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांसोबत नेहमीच खटके उडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

ही बातमी वाचली का? निवडणूक येताच चौकाचौकात चमकोगिरी

मिनी सी-शोअर येथे असणाऱ्या उद्यानामध्ये लहान मुलांना नागरिक खेळण्यासाठी घेऊन येतात. तसेच प्रेमी युगुल व ज्येष्ठ नागरिकदेखील मोठ्या संख्येने या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी येतात. या ठिकाणच्या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. त्यातच महाविद्यालयीन विद्यार्थी; तसेच काही उनाड मुले दुचाकीवरून स्टंटबाजी करत असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना अडथळा होत आहे. तर कोणी सूज्ञ नागरिकाने या ठिकाणी स्टंटबाजी करणाऱ्या युवकांना जाब विचारल्यास त्या व्यक्तीशी अरेरावी करून वाद घातला जात असल्याचे निदर्शनास येते. या ठिकाणी पोलिसांची गस्ती नसल्यामुळे महाविद्यालयीन तरुण बिनधास्तपणे स्टंटबाजी करतात, अशी ओरड नागरिक करत असून, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. 

ही बातमी वाचली का? दोन रिक्षांच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू

महाविद्यालयांसमोर टवाळखोरी 
कर्मवीर भाऊराव पाटील, झुनझुनवाला महाविद्यालय, जे. व्ही. एम. मेहता आदी महाविद्यालय व शाळांच्या बाहेरदेखील काही उनाड मुले स्टंटबाजी करतात. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून दोनपेक्षा अधिक जणांना बसवून वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अपघात घडतात. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थी; तसेच काही माजी विद्यार्थी, कार्यकर्तेदेखील राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने टवाळकी करत असतात. तसेच वाहनेदेखील खूप जलदगतीने चालवत असल्याने छोटे-मोठे अपघात घडतात, अशी माहिती एका महाविद्यालयाच्या सुरक्षा रक्षकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 

ही बातमी वाचली का? वैद्यकिय शिक्षणासाठी १० वर्षाची मर्यादा

मिनी सी-शोअर येथे नेहमीच महाविद्यालयीान मुलांची स्टंटबाजी सुरू असते. त्यांच्या गाड्यांच्या होणाऱ्या कर्णकर्कश आवाजाने त्रास होतो; तर मुलांची स्टंटबाजी सुरू असताना या ठिकाणाहून पार्क करण्यात आलेली गाडी काढणे भीतिदायक वाटते. 
- दीपक जाधव, नागरिक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youngsters Stunts in the mini C-Shore area of ​​Vashi