योगप्रगतीतील सहा बाधक तत्त्वे

योगप्रगतीतील सहा बाधक तत्त्वे

आपण मागील लेखात पतंजलींनी सांगितलेली मनाची प्रसन्नता टिकवणारी ‘चित्त प्रसाधनम्’ ही संकल्पना पाहिली. आज आपण योगमार्गात किंबहुना संपूर्ण आयुष्यात आपल्या प्रगतीच्या आड येणारे वैयक्तिक पातळीवरचे अडथळे पाहू. हठयोगात त्यांना ‘धक तत्त्वे’ म्हटले आहे. हठयोगात सहा बाधक तत्त्वे सांगितली आहेत. योग मानवी क्षमतेला उच्चांकावर नेणारे शास्त्र आहे. डोंगर चढायचा असल्यास तुम्हाला जड आणि गतिमंद करणारे बोजड सामान मागे सोडले पाहिजे, त्याने फक्त ऊर्जेचा ऱ्हासच होतो. योगाचा उद्देश आपली शक्ती वाचवणे आणि वाढवणे आहे, वाया घालवणे नाही. आपल्या उन्नतीच्या मार्गातले, शक्ती वाया घालवणारे, बोजड सामान म्हणजे हठयोगात सांगितलेली ‘बाधक तत्त्वे’. 

अत्याहार (Over Eating) 
हठयोगात आहारावर सविस्तर भाष्य केले आहे; तसेच गीतेतही ‘युक्त आहारा’वर भर दिला आहे. अतिखाणे योग मार्गास आणि आरोग्यास हितकारक नाही. आपल्या भुकेइतपत वा पोट पूर्ण भरण्याच्या २० ते २५ टक्के अगोदर खाणे थांबले पाहिजे. अतिखाण्याने शरीरात व मनात जडत्व येते. असे मोठा काळ सुरू राहिल्यास शरीरात विषारी द्रव्ये साचायला लागतात. पचनावर परिणाम होतो आणि अस्वस्थपणा येतो. अशा अस्वास्थ्यात योग किंवा कुठलेही उच्च दर्जाचे काम होऊ शकत नाही. शरीर व मनाचा हलकेपणा आरोग्याचे मुख्य लक्षण आहे. 

प्रयास (Exertion) 
शरीर व मनाला अतिकष्ट देणाऱ्या, अतिथकवणाऱ्या‍ गोष्टी टाळल्या पाहिजेत. अनावश्यक ताण आपल्या यंत्रणेची झीज करतो. शक्ती वाया घालवून कोणतेही शिखर गाठणे शक्य होणार नाही. अतिताण आपल्याला असंतुलित करतो. आठवून बघा, कधी अतिथकव्याने तुमची चिडचिड झाली आहे का? 

प्रजल्प (Over Talkativeness) 
अतिबोलण्याने काय होते, हे सर्वांनी अनुभवले असेलच. वाचिक, मानसिक, शारीरिक झीज अतिबोलण्याने होते. वेळ तर वाया जातोच. त्या वेळेचा सदुपयोग होऊ शकतो. अनावश्यक गप्पा, अर्थहीन चकाट्या, दुसऱ्याची निंदा, गॉसिपिंग यांनी आपल्या आत नकळत नकारात्मक कंपने तयार होतात. मन विचलित होते आणि ऊर्जा असंतुलित राहते. 

नियमाग्रह (Over Adherence to Rules) 
नियम आणि शिस्त पाळायचे नाही, हा अर्थ येथे अपेक्षित नाही. पतंजली मुनी योगशास्त्राच्या सुरुवातीलाच म्हणतात, ‘अथ योगानुशासनम्’. मात्र, आपल्या वागण्यात, सवयींमध्ये, विचारांमध्ये सहजता असावी. ज्या नियमांवर तुमचा मूळ उद्देश अवलंबून नाही, ते परिस्थितीनुसार शिथिल करावेत. तुम्ही एखादी सवय वर्षानुवर्षे पाळत आहात, ती व्यावहारिक कारणांमुळे एखाद्या दिवशी पाळता येणे शक्य नसल्यास त्याचा अट्टहास धरू नये. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जनसंग (Company of Common People) 
एखाद्याच्या सहवासातून काहीच मिळत नसल्यास आपली आंतरिक शक्ती वाया जाते. सारखेच लोकांच्या गराड्यात राहणे, वाईट संगत, लोकसंग्रह करून निरर्थक वेळ वाया घालवणे प्रगतीच्या मार्गातले अडथळे आहेत. अशा प्रवृत्तींच्या जनसंगातून भावनांचा असमतोल निर्माण होतो. शांती आणि पावित्र्य टिकून राहण्यात बाधा येते आणि मन विचारांमुळे विचलित राहते. 

लौल्य (Unsteadiness) 
शरीर-मनाची चंचलता, एका जागी न बसता येणे, विचारांची अस्थिरता, निर्णय घेण्यात धरसोडपणा, वागण्यात एकसंधता नसणे, अस्ताव्यस्त जीवनशैली हे मनाच्या अस्थिरतेतून निर्माण होतात. या अस्थिरतेतून कोणतेही उच्चदर्जाचे कार्य घडू शकत नाही. स्थिर मन, निश्चयात्मक बुद्धी हे योग साध्य होण्यासाठी अत्यावश्यक आहेत. 

या सहा अडथळ्यांवर, बाधक तत्त्वांवर कटाक्षाने मात केल्यास वेळ आणि शक्ती वाचेल, वाढेल आणि सदुपयोगी पडेल. सवयी बदलणे अवघड असले, तरी अशक्य नक्कीच नाही. बदल गरजेचा आहे, याची जाणीव निर्माण होणे आणि निर्धाराने परिवर्तनाकडे वाटचाल करण्याची इच्छा असणे, यामुळेच प्रगतीचे व योगाचे पुढील टप्पे गाठता येतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com