सैनिक, माजी सैनिक आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना माफक दरात रुग्ण सेवा- वीरनारी महिला बचत गट

file photo
file photo

नांदेड : देशसेवेसाठी सिमेवर लढताना ज्या सैनिकांना वीरमरण आले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी त्यांच्या वीरपत्नी, वीर माता आणि माजी सैनिक कुटुंबातील महिलांनी एकत्र येऊन युद्धविधवा संजीवनी माजी सैनिक महिला बचतगटाच्या माध्यमातून हेल्थ केअर सेंटर राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे सैनिक, माजी सैनिक आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या सदस्यांना माफक दरात रुग्ण सेवा सोमवारी (ता. दोन) नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आल्याचे बचतगटाच्या प्रमुख वीरनारी अरुणा टरके यांनी सांगितले. मराठवाड्यातील हा पहिला प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले. 

हेल्थ केअर सेंटरची स्थापना नांदेड युद्ध विधवा संजीवनी माजी सैनिक महिला बचत गट संचलित हेल्थ केअर सेंटर नांदेड जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेत कार्यरत झाले आहे. शहरात महिला बचतगटाच्या माध्यमातून ही रुग्ण सेवा देण्याची पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले. एकाच छताखाली एकत्रित सेवा देण्याचा या बचत गटाचा प्रयत्न आहे. या सेवेअंतर्गत तज्ञ डॉक्टरच्या ओपीडी सर्विसेस. प्रत्यक्ष ऑनलाइन पद्धतीने अतिशय सवलतीच्या दरात पॅथॉलॉजी सर्विसेस, फार्मसी विभाग, उपलब्ध हेल्थ इन्शुरन्स, ग्रुप मेडिकल तपासणी, सर्जिकल उपकरणे भाडेतत्त्वावर उपलब्धता, रुग्णवाहिका सेवा, जीवन प्रमाण प्रमाणपत्र सेवा आणि शासनाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन या सेवेचा शुभारंभ झाला आहे. 

आजारावर निदान व उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर 

डॉक्टर लेन परिसरातील चाणक्य बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर हे हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. याचा गरीब, माजी सैनिक, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबिय आणि गरजू रुग्णांना अतिशय माफक दरात रुग्ण सेवा देण्यात येणार आहे. बचत गटाच्या अध्यक्षा अरुणा टरके, सचिव अरुणा डोम, कार्यकारी संचालिका रजनी कमलाकर शेटे, कोषाध्यक्ष शोभा निलावार या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियोजनातून हे हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये विविध आजारावर निदान व उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत. विशेष म्हणजे रुग्णवाहिकेची सोय असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची ससेहोलपट होणार नाही.  

विरनारी महिला बचतगटाच्या सदस्या

शिलादेवी पवार, ज्योती थोरात, शितल कदम, बीबी रुबिना, उज्वला वडजे, सविता इंगोले, भारती गोवंदे आणि लक्ष्मी वाघमारे यांनीही या रुग्णसेवेसाठी स्वत: झोकून दिले आहे. माजी सैनिक महिला बचत गटाची स्थापना सन २०१० मध्ये करण्यात आली. बचतगटाच्या माध्यमातून कॉर्डीया रुग्णवाहिका सुरु केली होती. सुरवातीपासून आरोग्यसेवा देण्याच्या मानसिकतेतूनच हे काम सुरु केले आहे. येणाऱ्या काळात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पुर्णत: मोफत रुग्ण सेवा देण्याचा विचार असल्याचे विरनारी अरुणा टरके आणि रजनी शेटे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com