सराफा - कापड व्यापाऱ्यांची चिंता मिटली 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 22 May 2020

कोरोनामुळे जगात विचित्र पायंडा पडला आहे. दोन महिन्यापूर्वी कोरोना काय आला आणि भारतीय रुढी, परंपरा आणि संस्कृतीला जणू छेद देणाऱ्या घटना घडामोडी वेगाने घडताना दिसून येत आहेत.

नांदेड : अगदी काही दिवसांपूर्वी पार पडलेले लग्न सोहळे बघितले तर नाही म्हटले तरी, पाचशे ते हजार बाराशे वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत सोहळे पार पडत होते. वधूवरांची जोडी नवीन उंची कपडे, डोळे दिपवणारा साज शृंगार आणि सोन्या- चांदीने नटलेली नवरी अनेकांनी बघितली असेलच. परंतु हल्ली ना सोने - चांदी, ना घोडा ना गाडी, ना उंची कपडे, ना मेकअप अगदी मोजक्या वऱ्हाडी मंडळीच्या साक्षीने विवाह सोहळा ‘झट मंगनी, पट शादी’ करुन नवरी नवरदेव घरीच लॉकडाउनचा आनंद घेत सुखी संसाराची गोड स्वप्ने रंगवत आहेत.

मात्र, लगीन सराईत खास वधूवरांसाठी फॅशनेबल उंची वस्त्रे आणि सराफा व्यापाऱ्याने तयार केलेले आकर्षक दागिने तयार असताना लॉकडाउनमुळे अख्खा सिझन संपत आला तरी, कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होत नसल्याचे बघून वधू वरांसहित नात्यातील मंडळी सोने, नाणे आणि कापड खरेदीच्या भानगडीत न पडता जमेल त्या मणी मंगळसुत्राचा आधार घेत लग्न उरकून घेत असल्याने व व्यापार बंद असल्याने सराफा व्यापारी यांना मात्र वधूवरांच्या कपड्यांची व दाग दागिन्याशिवाय होत असलेल्या लग्न सोहळ्याची चिंता वाटू लागली. मात्र शनिवार (ता.२३) पासून सराफा आणि कापड बाजार सुरु होणार असल्याने व्यापाऱ्यांची चिंता मिटली आहे.

हेही वाचा- वेदनादायक : उपचाराला पैसे नसल्यामुळे तरुणीची आत्महत्या

व्यापारी वर्गात आनंद
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी, मागील दोन दिवसापासून हळूहळू बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेसह किरकोळ दुकाने व प्रतिष्ठाने समान अंतर राखून सुरु करण्यात आली होती. यामध्ये सराफा आणि कापड व्यापाऱ्यांचा मावेश नव्हता. त्यामुळे सोने - चांदी किंवा कपड्यांची दुकाने उघडणार की नाही? या बद्दल व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था कायम आणि चिंता होती. शुक्रवारी (ता.२२) जिल्हा प्रशासनाने नव्याने प्रसिद्धी पत्रकात बदल करुन नवीन काही दुकाने व प्रतिष्ठाने सुरु ठेवण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे लग्न सराई संपत आली असली तरी, व्यापाऱ्यांना दुकाने सुरु ठेवण्यासाठी देण्यात आलेली सुट'यामुळे व्यापारी वर्गात आनंद दिसून येत होता. 

हेही वाचा- कापूस विक्रीसाठी २५ पर्यंत ऑनलाईन नोंदणी

स्वतःची व ग्राहकांची योग्य ती काळजी​  घ्या

मागील काही दिवसापासून लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र नुकसानी पेक्षा व्यक्तीच्या आरोग्याची सुरक्षा महत्वाची आहे. शनिवारपासून सराफा बाजारपेठ उघडण्यास  मुभा देण्यात आली. दरम्यान शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करुन व्यापारी बांधवांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करत स्वतःची व ग्राहकांची योग्य ती काळजी घेऊन दुकाने सुरु ठेवावीत.
- सुधाकर टाक धानोरकर, सचिव, सराफा असोसिएशन, नांदेड.  
----


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bullion - Textile Traders Worries Allayed Nanded News