
नांदेड वाघाळा महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये महापौर मोहिनी येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी अकरा वाजता आॅनलाइन सभेला सुरूवात झाली. यावेळी उपमहापौर मसूदखान, आयुक्त डॉ. सुनील लहाने, नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
नांदेड - नांदेड वाघाळा महापालिकेच्या स्थायी समितीच्या कॉँग्रेसच्या आठ सदस्यांची सोमवारी (ता. २१) सकाळी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. या विषयासह फक्त दोन प्रस्ताव पारित करण्यात आले आणि पंधरा मिनिटात सभा होऊन हद्दवाढीच्या प्रस्तावासह इतर विषय बाजूला ठेवत सभा स्थगित करण्यात आली.
नांदेड वाघाळा महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये महापौर मोहिनी येवनकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सकाळी अकरा वाजता आॅनलाइन सभेला सुरूवात झाली. यावेळी उपमहापौर मसूदखान, आयुक्त डॉ. सुनील लहाने, नगरसचिव अजितपालसिंघ संधू यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
हे ही वाचा - नांदेड - सोमवारी २९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह
आठ सदस्यांची निवड जाहीर
सुरवातीला स्थायी समितीच्या आठ सदस्यांच्या निवडीसाठी सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी आठ सदस्यांच्या नावाची यादी महापौर येवनकर यांच्याकडे सादर केली. त्यानंतर महापौरांनी नावे जाहीर केली. त्यात किशोर स्वामी, विरेंद्रसिंग गाडीवाले, बालाजी जाधव, अलीमखान, कविता मुळे, ज्योती कदम, प्रभा यादव, रिहाना बेगम चांदपाशा कुरेशी यांचा समावेश आहे. नव्या सदस्यांचे यावेळी महापौर मोहिनी येवनकर आणि विजय येवनकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
४० पैकी फक्त तीन प्रस्ताव मंजूर
या सभेत एकूण ४० प्रस्ताव ठेवण्यात आले होते. त्यामध्ये महापालिकेच्या हद्दवाढीसह इतर महत्वाचे विषय होते. मात्र, या वेळी फक्त तीन विषयावर चर्चा करून ते मंजूर करण्यात आले आणि बाकी ३७ विषय बाजूला ठेवत पंधरा मिनिटात सभा तहकूब करण्यात आली. महापालिका हद्दीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतंर्गत कामे मंजूर करण्याचा प्रस्ताव सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी सूचक म्हणून मांडला होता तर माजी उपमहापौर आनंद चव्हाण आणि नगरसेवक दुष्यंत सोनाळे यांनी अनुमोदन दिले होते. तसेच महापालिका हद्दीतील नगरोत्थान आणि अमृत योजनेची शिल्लक कामे पूर्ण करण्याचा प्रस्ताव सूचक म्हणून माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांनी मांडला होता तर त्यास माजी सभापती किशोर स्वामी यांनी अनुमोदन दिले होते. हे दोन प्रस्ताव मंजूर करत बाकीचे प्रस्ताव बाजूला ठेवत महापौर येवनकर यांनी सभा तहकूब केली.
हेही वाचलेच पाहिजे - ‘येळकोट येळकोट, जय मल्हारी मार्तंड’चा घरोघरी जयघोष
सभापतींची लवकरच निवड
स्थायी समितीच्या १६ सदस्यांची समिती झाल्यानंतर आता सभापतीची निवडही वर्षाअखेरीस किंवा नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सभापतीपदासाठी कॉँग्रेसमधील अनेकांची नावे चर्चेत असली तरी अंतिम निर्णय पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे असल्यामुळे ते कोणाचे नाव जाहीर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.