नांदेडला गोळीबार प्रकरणातील चार आरोपी ताब्यात; दोघांचा शोध सुरू 

अभय कुळकजाईकर
Monday, 5 October 2020

नांदेड शहरातील जुना मोंढा भागात महाराजा रणजितसिंह मार्केटमधील तीन दुकानांवर दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी गोळीबार केला होता. त्यात पानपट्टीचालकही जखमी झाला होता. गोळीबाराच्या या घटनेनंतर पोलिसांनी नाकेबंदी करत २४ तासात चार संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली.

नांदेड - शहरातील जुना मोंढा भागात दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी व्यापाऱ्याला लुटण्याची तसेच गोळीबार केल्याची घटना रविवारी (ता. चार) घडली होती. या प्रकरणातील चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तपास सुरू आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अजूनही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. त्या दोन जणांना पकडल्यानंतर प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सोमवारी (ता. पाच) पत्रकार परिषदेत दिली. 

नांदेड शहरातील जुना मोंढा भागात महाराजा रणजितसिंह मार्केटमधील तीन दुकानांवर दुचाकीवरून आलेल्या सहा जणांनी गोळीबार केला होता. त्यात पानपट्टीचालकही जखमी झाला होता. गोळीबाराच्या या घटनेनंतर पोलिसांनी नाकेबंदी करत २४ तासात चार संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली. या पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील, डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, साहेबराव नरवाडे, संदीप शिवले उपस्थित होते. 

हेही वाचा - अधिक मास कोरोनाच्या सावटात, जावयांची मेजवानी हुकली : भेटवस्तूंही नाही 
 

चार ताब्यात; दोन फरार
गोळीबाराची घटना झाल्यानंतर घटनास्थळी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हेल्मेट घातलेले सहा हल्लेखोर दिसून आले. त्यानुसार व्यापाऱ्यांशी चर्चा करुन पोलिसांनी नाकेबंदी केली. त्यात चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील उर्वरित दोन आरोपी अजूनही फरार आहेत. ते ही लवकरच सापडतील असा विश्वास पोलिस अधीक्षक श्री. शेवाळे यांनी व्यक्त केला. 

पूर्वनियोजित घटना 
चार जणांची कसून चौकशी सुरू असून फरार झालेले दोन्ही आरोपींना देखील लवकरच पकडू, असे सांगून पोलिस अधीक्षक श्री. शेवाळे म्हणाले की, सदरील घटना ही पूर्वनियोजित होती. त्याचबरोबर या घटनेचा इतर घटनांशी किंवा गॅंगशी अद्याप तरी तपासात कोणताही संपर्क आलेला नाही. या घटनेत गावठी पिस्तुल वापरण्यात आले असून त्यातून तीन ते पाच राऊंड फायर झाले आहेत. घटनास्थळी खाली झालेले चार राऊंड मिळाले आहेत. यातील काही गुन्हेगार नवीन तर काही सराईत असल्याची माहितीही श्री. शेवाळे यांनी दिली. 

हेही वाचलेच पाहिजे - हरीत नांदेड अभियानांतर्गत महात्मा गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त वृक्षारोपण 

हत्येचा कट नव्हता
या घटनेत हत्येचा कट नव्हता. आरोपींना दहशत पसरवून खंडणी मागायची होती, असेच त्यांच्या हालचालीवरून दिसून आले आहे. यातील काही गुन्हेगार हे नवीन असून १८ ते २२ वयोगटातील असल्याचीही माहितीही पोलिस अधीक्षक श्री. शेवाळे यांनी दिली. या प्रकरणातील आणखी दोन आरोपी फरार झाले असल्यामुळे त्यांचा शोध सुरु आहे. त्यामुळे आरोपींची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. सहाही आरोपींना अटक झाल्यानंतर नावे जाहीर करण्यात येतील, अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, सहस्त्रकुंड प्रकरणातील एकाच कुटुंबातील आत्महत्येप्रकरणात अद्याप दोन मुलींचे मृतदेह सापडले नाहीत. याबाबतचा गुन्हा यवतमाळ जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात झाला असून नांदेडचे पोलिस त्यांना तपासासाठी सहकार्य करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four accused in Nanded shooting case detained; The search for both continues, Nanded news