नांदेडला सुंदर शहर बनविण्याचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा संकल्प

अभय कुळकजाईकर
Monday, 4 January 2021

नांदेड वाघाळा महापालिकेच्यावतीने साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतंर्गत शहरातील प्रभाग क्रमांक सात आणि आठमधील विकासकामांचा शुभारंभ रविवारी सायंकाळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महापौर मोहिनी विजय येवनकर अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेतील कॉँग्रेसचे प्रतोद आमदार अमर राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, आयुक्त सुनील लहाने आदींची उपस्थिती होती.

नांदेड - शहरातील विकासकामांचा आराखडा तयार करण्यात येत असून नांदेडला सुंदर शहर बनविणार आहे. दर्जेदार व मुदतीत विकासकामांची माझी गॅरंटी असल्याची ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी (ता. तीन) दिली.

नांदेड वाघाळा महापालिकेच्यावतीने साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतंर्गत शहरातील प्रभाग क्रमांक सात आणि आठमधील विकासकामांचा शुभारंभ रविवारी सायंकाळी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. महापौर मोहिनी विजय येवनकर अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेतील कॉँग्रेसचे प्रतोद आमदार अमर राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, आयुक्त सुनील लहाने, जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरीहरराव भोसीकर, उपमहापौर मसूद अहेमद खान, स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, महिला व बालकल्याण सभापती सरिता बिरकले, काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, नगरसेवक बालाजी जाधव, बापूराव गजभारे, संगीता डक, संदीप सोनकांबळे, अब्दुल अलीम खान, मुंतजोबोद्दीन मुनीरोद्दीन, सलीमा बेगम, दुष्यंत सोनाळे, किशोर भवरे, किशन कल्याणकर आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - नांदेड : मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवून देण्यासाठी १० लाखास फसविले 

नांदेडला सुंदर शहर बनविण्याचे स्वप्न 
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, नव्या वर्षात शहरातील विकासात्मक कामाला सुरुवात होत आहे. या भागातील विकासकामांच्या मागणीला अनुसरुन विकासनिधी देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ३५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. प्रभागातील अंतर्गत रस्ते व प्रमुख रस्त्यांची कामे मार्गी लागली पाहिजेत. शहरातील विकासकामे करताना महापालिका हद्दीत आलेल्या गावांनाही विकासनिधी उपलब्ध करुन देणार आहे. शहर विकासाचे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता आगामी काळात करण्यात येणार आहे. विकासात्मक दृष्टीकोनातून नांदेडचा विकास व्हावा, यावर आपला भर असल्याचे ते म्हणाले. नांदेडला सुंदर शहर बनविण्याचे आपले सर्वांचे स्वप्न आहे. यासाठी विकासकामे करताना कोणीही त्यात अडवणूक करु नये. दर्जेदार व मुदतीत विकासकामे होतील, याची गॅरंटी आपली असल्याची ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली. 

महाविकास आघाडीकडून भरीव निधी - राजूरकर​
आमदार राजूरकर म्हणाले की, भाजप सरकारच्या कार्यकाळात निधी अभावी शहर विकासाची कामे ठप्प होती. आता महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शहर विकासासाठी भरीव निधी उपलब्ध होत आहे. महापालिकेच्या हद्दीतील २७ किलोमीटर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तर शहरातील उर्वरित रस्त्यांच्या कामासाठी नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. शहरातील विकास कामांसाठी ४० कोटी रुपये निधींची मागणी करण्यात आली होती. मात्र, पालकमंत्री चव्हाण यांनी ५० कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करुन दिला आहे. या प्रमाणेच पुढील वर्षीही शहरातील विकास कामांसाठी ५० कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी केली.

हेही वाचलेच पाहिजे - दुचाकी चोरांच्या उपद्रवामुळे नांदेडकर झाले त्रस्त, पोलिस प्रशासन मात्र सुस्त 

खासदारांनी विकासाची स्पर्धा करावी
शहर व परिसरातील रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. मात्र, केंद्र शासनाच्या अख्त्यारीत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. खासदारांनी गप्पा मारण्यापेक्षा विकासांची स्पर्धा करावी. आम्ही करतो त्या तुलनेत दहा टक्के तरी काम करुन दाखवा, असे आमदार अमर राजूरकर म्हणाले. यावेळी महापौर मोहिनीताई येवनकर यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्ष यांच्या माध्यमातून शहराचा कायापालट होणार असून भाजप सरकारच्या कार्यकाळात ठप्प असलेल्या विकासाचा रथ या सरकारच्या कार्यकाळात धावेल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक महापालिकेचे आयुक्त डॉ.सुनिल लहाने, सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी केले.
  
राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था
सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेच्या वतीने रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. मात्र केंद्र शासनाच्या अख्त्यारीत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था बिकट झाली असून राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांची कामे व्हावीत, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे याकडे लक्ष वेधल्याचेही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

विकास कामांवर माझे लक्ष
शहरातील विकासकामे करत असताना प्रत्येक प्रभागात विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत. शहरात होणाऱ्या विकासकामांवर आपले लक्ष असून विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.
- अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Ashok Chavan's resolve to make Nanded a beautiful city, Nanded news

टॉपिकस