
त्यामुळे भाजपला येणाऱ्या काळात जिल्ह्यात चांगले दिवस येतील असे बोलल्या जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीममधील हे नवे शिलेदार जोमाने पक्षवाढीसाठी कामाला लागतील असा विश्वास कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
नांदेड : भारतीय जनता पक्षाची राज्य कार्यकारिणी जाहीर झाली. त्या कार्यकारिणीत नांदेड येथून तब्बल दहा जणांचा समावेश झाला आहे. त्यामुळे भाजपला येणाऱ्या काळात जिल्ह्यात चांगले दिवस येतील असे बोलल्या जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीममधील हे नवे शिलेदार जोमाने पक्षवाढीसाठी कामाला लागतील असा विश्वास कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. माजी खासदार तथा ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, महानगराचे माजी अध्यक्ष संतुक हंबर्डे, ॲड. चैतन्यबापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, संजय कौडगे, माजी महापौर अजयसिंह बिसेन, सुधाकर भोयर, महिला प्रतिनीधी संध्या राठोड यांचा यात समावेश आहे.
संघटनात्मक पातळीवर देखील पक्षाची जबाबदारी आणखी वाढली
राज्यात शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर भारतीय जनता पक्ष विरोधी बाकावर बसला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर देखील पक्षाची जबाबदारी आणखी वाढली आहे. जनतेचे प्रश्न घेऊन पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारविरुद्ध रान उठवून अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या टीममध्ये नांदेडमधून तब्बल दहा जणांना संधी मिळाली आहे.
हेही वाचा - महिला भजनी मंडळांना ‘या’ बॅंकेचा लाभ...कुठे ते वाचा.
भाजपच्या कार्यकर्त्यांना या माध्यमातून बळ देण्याचा प्रयत्न
काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना या माध्यमातून बळ देण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून झाला असल्याचे मानले जाते. लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभूत करून प्रतापराव पाटील चिखलीकर निवडून आले. याशिवाय मुखेड मतदार संघातून डॉ. तुषार राठोड तर किनवट मतदार संघातून भीमराव केराम असे दोन आमदार भाजपच्या तिकिटावर निवडून आले. याशिवाय राम पाटील रातोळीकर यांच्या माध्यमातून पक्षाने नांदेडला विधान परिषदेतही याआधी संधी दिली आहे. त्यामुळे खासदार चिखलीकर तसेच वरील सर्व आमदारांच्या मदतीला संघटनात्मक पातळीवर काम करण्यासाठी आता चंद्रकांत पाटलांच्या टीममधील खेळाडू किती सक्षमपणे काम करतात याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.
यांना मिळाली संधी
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवर पक्षातील अनुभवी व ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. या आधी त्यांनी रावसाहेब दानवे यांच्या टीममध्ये प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री माधवराव पाटील यांनाही पक्षाने संधी दिली आहे. माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा तसेच चैतन्यबापू देशमुख यांनाही कार्यकारिणीवर स्थान मिळाले आहे. चैतन्यबापू सलग दुसऱ्यांदा प्रदेश कार्यकारिणीवर गेले आहेत. दिलीप कंदकुर्ते, संजय खोडके, माजी महापौर अजय बिसेन, डॉ. संतुक हंबर्डे, सुधाकर भोयर व महिला प्रतिनिधी म्हणून संध्या राठोड यांना पक्षाच्या कार्यकारिणीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. डॉ. अजीत गोपछडे यांची भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.