Nanded : शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरीत थांबवावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded news

Nanded : शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरीत थांबवावा

नांदेड : राज्यात मागील काही दिवसांपासून शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. कमी पटसंख्या हे कारण पुढे करुन ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा बंद केल्या जात आहेत. नांदेड जिल्ह्यात ३३६ शाळा बंद होणार असून या शाळा बंद करू नयेत, यासाठी एसएफआय व डीवायएफआयतर्फे शुक्रवारी (ता. सात) जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: Nanded : जिल्ह्यात लम्पीने २६ मृत्यू

कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे निषेध करण्यात आला. शाळेच्या सोयी सुविधांमध्ये वाढ करुन दर्जेदार शाळा बनविण्याचे सोडून कायमच्याच शाळा बंद करणे, हा अत्यंत घातक निर्णय आहे. या निर्णयामुळे ग्रामीण, कष्टकरी, शेतकरी मजुरांच्या विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे आधीच शिक्षणापासून लांब असलेल्या आदिवासी, दलित, बंजारा व बहुजन समाजातील विद्यार्थी कायमच शिक्षण क्षेत्रातून बाहेर फेकले जातील.

हेही वाचा: Nanded : हल्लाबोल मिरवणूक नांदेडमध्ये उत्साहात साजरी

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करून या शाळा अधिक सक्षम करण्यासाठी त्वरीत पावले उचलावीत. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमधील मुलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात. शाळांचा गुणात्मक दर्जा सुधारावा. अनेक शाळांच्या शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागा त्वरीत भराव्यात आदी मागण्यांना घेऊन डीवायएफआय व एसएफआयच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: Nanded : अतिवृष्टीतून वाचलेल्या सोयाबीन काढणीस प्रारंभ

आंदोलकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर - घुगे यांना निवेदन दिले. या आंदोलनात किसान सभेचे अर्जुन आडे, शेतमजूर युनियनचे विनोद गोविंदवार, मंजुश्री कबाडे, अंकुश अंबुलगेकर, सीआयटीयू कामगार संघटनेचे गंगाधर गायकवाड, उज्ज्वला पडलवार, डीवायएफआयचे बालाजी कलेटवाड, स्टँलिन आडे, एसएफआयचे मीना आरसे, विशाल भद्रे, जनार्दन काळे आदींनी सहभाग घेतला