नांदेडला पाणीटंचाई निवारणावर झाला २३ कोटींचा खर्च

अभय कुळकजाईकर
Saturday, 12 September 2020

नांदेड जिल्ह्यात यंदा उन्हाळी टंचाई निवारणावर २३ कोटी १५ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. दहा गावे व सतरा वाडी तांड्यांवर २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा तर १४७ गावात खासगी विहीर व कूपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले होते. 

नांदेड - यंदा उन्हाळी टंचाई उपाय योजनातंर्गत जिल्ह्यातील दहा गावे व सतरा वाडीतांड्यावर २१ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला. या सोबतच १४७ गावांमध्ये खासगी विहीर व कूपनलिकेचे अधिग्रहण करून गावकऱ्यांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या सोबतच नवीन विंधन विहिरी घेणे, नळपाणी पुरवठा योजनांची तसेच विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती करणे, तात्पुरती पूरक नळ योजना, तातडीची पाणीपुरवठा योजना या सोबतच विहिरी खोल करून गाळ काढणे आदी बाबींवर २३ कोटी १५ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई निवारण कक्षातून देण्यात आली.

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागासह काही नागरी वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागते. यासाठी प्रशासनाला टंचाई निवारणाच्या उपाययोजना करून नागरिकांना खासगी तसेच शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. या सोबतच ग्रामीण व नागरी भागात खासगी विंधन विहिरी तसेच कूपनलिकेचे अधिग्रहण करून नागरिकांना तसेच जनावरांना पाणीपुरवठा केला जातो. मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात टंचाईची तीव्रता कमी स्वरूपात होती. 

हेही वाचा - Video - नांदेड : युवा बागायतदाराने पानमळा शेती फुलवून उत्पन्नाने साधली प्रगती 

मागील वर्षी ३५ कोटींचा खर्च
मागील वर्षी ६२ टॅंकरद्वारे ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यात आला होता. तरी या टंचाईवर ३५ कोटी रुपयांचा खर्च झाला होता. यंदा मात्र मागील वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे टंचाईची स्थिती अधिक जाणवली नाही. उन्हाळ्याच्या शेवटी जिल्ह्यातील दहा गावे व १७ वाड्यांवर २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. या सोबतच १४५ ठिकाणी खासगी विहीर व कूपनलिकेचे अधिग्रहण करण्यात आले. या सोबत २७४ ठिकाणी नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या. तर २८२ ठिकाणी नळ पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्ती करण्यात आली. या सोबतच ९८२ ठिकाणी विंधन विहिरीची विशेष दुरुस्ती करण्यात आली. १०४ ठिकाणी तात्पुरती पूरक नळ योजना अथवा तातडीची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. दोन ठिकाणी विहीर खोलीकरण करण्याचे काम करण्यात आले. 

हेही वाचलेच पाहिजे - Video- परभणी : मराठा समाजातील आमदार, मंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेश देणार नाही- संभाजी ब्रिगेड

यंदाही जिल्ह्यात समाधानकारक स्थिती
जिल्ह्यात २६३ वाड्या व ८१५ गावात एक हजार ७३ उपाययोजना राबविण्यात आल्या. यासाठी जिल्ह्याला २३ कोटी १५ लाख रुपये खर्च झाला. यात नवीन विंधन विहिरी घेण्यासाठी एक कोटी ७२ लाख योजनांची विशेष दुरुस्तीसाठी १३ कोटी १८ लाख, तात्पुरती पूरक नळ योजना कार्यान्वित करण्यासाठी सात कोटी २१ लाख, टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी ४६ लाख, खासगी विहीर अधिग्रहण करण्यासाठी ५२ लाख, विहीर खोली करण्यासाठी तीन लाख या प्रकारे खर्चाचा समावेश आहे. यंदाही जिल्ह्यात समाधानकारक पावसाची स्थिती असल्यामुळे जिल्हा तसेच जिल्हा शेजारील प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत त्यामुळे आगामी काळात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता कमी आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded spent Rs 23 crore on water scarcity relief, Nanded news