esakal | नांदेडचा ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सव रद्द; कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोना काळातील अशा प्रतिकुल परिस्थितीत रसिकांना घरी बसूनच सोळा वर्षांतील दर्जेदार कार्यक्रमांच्या स्मृतींना उजाळा देता यावा, यासाठी हे निवडक कार्यक्रम ‘संगीत शंकर दरबार’ या फेसबुक पेज व यु ट्युब चॅनलवरून पाहता येणार आहेत. मागील सोळा वर्षांतील संगीत शंकर दरबार महोत्सवाच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी घ्यावा.

नांदेडचा ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सव रद्द; कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्णय

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - भारताचे माजी गृहमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक डॉ. शंकरराव चव्हाण आणि सौ. कुसूमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केला जाणारा ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सव यंदा कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रद्द करण्यात आला आहे. परंतू रसिकांचा हिरमोड होऊ नये म्हणून ‘संगीत शंकर दरबार’  या फेसबुक पेज आणि यु ट्युब चॅनलवरून मागील सोळा वर्षांतील निवडक स्मृतींना उजाळा दिला जाणार आहे.

कोरोना काळातील अशा प्रतिकुल परिस्थितीत रसिकांना घरी बसूनच सोळा वर्षांतील दर्जेदार कार्यक्रमांच्या स्मृतींना उजाळा देता यावा, यासाठी हे निवडक कार्यक्रम ‘संगीत शंकर दरबार’ या फेसबुक पेज व यु ट्युब चॅनलवरून पाहता येणार आहेत. मागील सोळा वर्षांतील संगीत शंकर दरबार महोत्सवाच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री अशोक चव्हाण, उपाध्यक्षा अमिता चव्हाण, सचिव डी. पी. सावंत, सहसचिव अ‍ॅड. उदय निंबाळकर, कोषाध्यक्ष डॉ. रावसाहेब शेंदारकर तथा संस्थेचे अन्य पदाधिकारी आणि संयोजन समितीतील संजय जोशी, रत्नाकर अपस्तंभ अपर्णा नेरलकर, ऋषिकेश नेरलकर, गिरीश देशमुख, प्रा. विश्वाधार देशमुख आदींनी केले आहे.

हेही वाचा - नांदेड वाहतूक शाखेची धाडशी कारवाई: ७९ बुलेटसह १३९ दुचाकी केल्या जप्त; पाच लाखाचा दंड वसुल

असे आहेत आॅनलाइन कार्यक्रम
ता. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता ‘पूर्वसंध्ये’चा कार्यक्रम प्रसारित होणार असून या कार्यक्रमात शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, उषा मंगेशकर आणि ‘सारेगम चँम्प्स’मधील राहुल सक्सेना, उर्मिला धनगर, कार्तिकी गायकवाड आदी मान्यवरांच्या गायनाचा आस्वाद रसिकांना घेता येईल. ता. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पंडीत हरिप्रसाद चौरसिया, डॉ. अश्विनी भिडे, पंडीत व्यंकटेश कुमार, पंडीत शिवकुमार शर्मा, गानसरस्वती किशोरी आमोणकर, डॉ. एन. राजम, पंडीत राकेश चौरसिया, पंडीत विश्वमोहन भट अशा दिग्गज कलावंतांच्या गायन-वादनाच्या स्मृतींना उजाळा देता येईल. ता. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता ‘मराठी पहाट’ या कार्यक्रमात पंडीत हेमंत पेंडसे, पंडीत रघुनंदन पणशीकर, संजय जोशी, सारिका आपस्तंभ या कलावंतांच्या कार्यक्रमांची गोडी अनुभवता येईल. ता. २७ रोजी सायंकाळी सहा वाजता पंडीत राजन, साजन मिश्र, उस्ताद राशिद खाँन, मंजुषा पाटील, ब्रजेश्वर मुखर्जी, नागेश आडगावकर, अंजली व नंदिनी गायकवाड, अंकिता जोशी व कृष्णा बोंगाने, डॉ. राम देशपांडे, तालयोगी पद्मश्री पंडीत सुरेश तळवलकर, डॉ. शुभा मुद्गल आणि पंडीत गणपती भट यांच्या गायन-वादनाचा लाभ रसिकांना घेता येणार आहे.

हेही वाचलेच पाहिजे - मध्यवर्ती बँकेच्या २१ जागांसाठी १५४ उमेदवारी अर्ज, शक्तीप्रदर्शनात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा   
 

‘शंकर साहित्य दरबार’महोत्सवही रद्द 
संगीत शंकर दरबारप्रमाणेच गत दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेला ‘शंकर साहित्य दरबार’ साहित्य महोत्सवही रद्द करण्यात आला आहे. रसिकांची सांगितिक आणि बौध्दिक भूक भागविणारे हे दोन्ही महोत्सव कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर यावर्षी नाईलाजाने रद्द करावे लागले तरी पुढच्या वर्षी मात्र ते भव्य दिव्य स्वरूपात घेतले जाणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शंकर साहित्य दरबार तूर्तास रद्द करण्यात येत असल्याचे श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे सचिव तथा  पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

loading image