महावितरण परिमंडळातील ‘एवढ्या’ ग्राहकांचे आॅनलाईन मीटर रिडींग

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

वीजवापरानुसार महावितरणकडून वीजबिल दिलेले आहे. यामध्ये पुणे परिमंडळातील सर्वाधिक ६९ हजार ९१२ तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडळातील ५८ हजार २१० वीजग्राहकांचा समावेश आहे. त्याचबरोबर नांदेड परिमंडळातील सात हजार ३४८ वीजग्राहकांचा समावेश आहे.

नांदेड : महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील तीन लाख ६३ हजार वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे गेल्या एप्रिल महिन्याचे स्वतः हून मीटर रिडींग पाठविले आहे. या सर्व ग्राहकांना त्यांच्या वीजवापरानुसार महावितरणकडून वीजबिल दिलेले आहे. यामध्ये पुणे परिमंडळातील सर्वाधिक ६९ हजार ९१२ तर त्यापाठोपाठ कल्याण परिमंडळातील ५८ हजार २१० वीजग्राहकांचा समावेश आहे. त्याचबरोबर नांदेड परिमंडळातील सात हजार ३४८ वीजग्राहकांचा समावेश आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाकडून लॉकडाऊनसारख्या प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महावितरणने गेल्या ता. २३ मार्चपासून वीजग्राहकांकडे जाऊन मीटर रिडींग घेण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे. यासोबतच वीजबिलांची छपाई करणे व त्याचे वितरण करणे देखील बंद करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडींग उपलब्ध होणे शक्य नसल्याने वीजग्राहकांनी सरासरीनुसार वीजबिल पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र, महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट व ‘महावितरण’ मोबाईल अॅपद्वारे वीजग्राहकांना मीटरच्या रिडींगचे फोटो पाठवून स्वतः रिडींग घेण्याची सोय उपलब्ध आहे.

हेही वाचा -  स्नेहनगर पोलीस वसाहतीचा विकास करणार- आ. कल्याणकर

तीन लाख ६३ हजार १७५ वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपचा वापर

या रिडींगप्रमाणे वीजवापराचे अचूक बिल तयार करण्यासाठी जास्तीत जास्त वीजग्राहकांनी मीटरच्या रिडींगचे फोटो पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी वीजग्राहकांना नोंदणी केलेल्या मोबाईलवर महावितरणकडून ‘एसएमएस’ पाठविला जात असून त्यामध्ये मीटर रिडींग पाठविण्याची मुदत नमूद करण्यात येत आहे. महावितरणच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या एप्रिल महिन्याच्या वीजवापराचे तब्बल तीन लाख ६३ हजार १७५ वीजग्राहकांनी पोर्टल व मोबाईल अॅपद्वारे दिलेल्या मुदतीमध्ये मीटर रिडींग पाठविले आहे.

राज्यभरातील परिमंडळनिहाय स्थिती

महावितरणकडे स्वतः हून मीटर रिडींग पाठविलेल्या वीजग्राहकांमध्ये पुणे परिमंडलामधील ६९ हजार ९१२, कल्याण- ५८ हजार २१०, भांडूप- ३७ हजार ५४३, नागपूर- २७७ हजार २०, नाशिक- २५ हजार ८३१, कोल्हापूर- २२ हजार ७२८, बारामती- २० हजार ९४१, जळगाव- १७ हजार ६६४, औरंगाबाद- १६ हजार ३७४, अकोला- १३ हजार ७६७, अमरावती- १३ हजार ५४०, चंद्रपूर- आठ हजार ८२४, कोकण- आठ हजार ५४२, नांदेड- सात हजार ३४८, गोंदिया- सात हजार २६८ आणि लातूर परिमंडळामधील सहा हजार ९६३ वीजग्राहकांचा समावेश आहे.

येथे क्लिक कराVideo : नृत्याचे महाराष्ट्राच्या संस्कृतीत काय आहे महत्त्व?, ते वाचाच

वीजदेयकांचा भरणा करावा असे आवाहन

महावितरणने वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या या सुविधेचा जास्तीतजास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा. महावितरणकडून प्रत्यक्ष रिडींग घेण्याची प्रक्रिया सुरु होईपर्यंत वीजग्राहकांनी मोबाईल अॅप व वेबसाईटमध्ये लॉगीन करून दिलेल्या मुदतीत मीटर रिडींगचा फोटो अपलोड करून मीटर रिडींग पाठवावे, त्याचबरोबर ज्या वीजग्राहकांना एसएमएस तसेच ईमेलद्वारे वीजदेयके प्राप्त झाली आहेत. त्यांनी ऑनलाईन पध्दतीने विहीत वेळेत वीजदेयकांचा भरणा करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online meter readings of 'so many' customers in MSEDCL nanded news