नांदेड जिल्ह्यातील मतदार कोणाला देणार तिळगुळ ; ९०७ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

अभय कुळकजाईकर
Friday, 15 January 2021

नांदेड जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकांची जिल्हा प्रशासनातर्फे संपुर्ण तयारी झाली असून याअनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिली.

नांदेड - जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा बुधवारी (ता. १३) थंडावल्या. गावाचा कारभार आता कोणाच्या हातात द्यायचा, याचा फैसला मतदार शुक्रवारी (ता. १५) देणार आहेत. आता मतदानाचे तिळगुळ मतदार कोणाला देणार व कोणावर संक्रांत येणार? हे सोमवारी (ता १८) मतमोजणी झाल्यावर स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या निवडणुका खेळीमेळीच्या आणि सौहार्दपुर्ण वातावरणात व्हाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आवाहन केले असून मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करावे असे सांगितले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकांची जिल्हा प्रशासनातर्फे संपुर्ण तयारी झाली असून याअनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी गुरूवारी (ता. १४) दिली. जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील एकूण एक हजार १३ ग्रामपंचायतीसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी १०६ ग्रामपंचायती बिनविरोध आल्याने ९०७ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (ता. १५) मतदान होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात गुरुवारी (ता. १४) सकाळी सहा वाजल्यापासून ते गुरुवारी (ता. २८ जानेवारी) मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार असल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा - सावधान : अर्धापुरात बिबट्या पडला विहिरीत; रेस्क्यु आॅपरेशन सुरु

दोन हजार ८५३ मतदार केंद्र 
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण दोन हजार ८५३ मतदार केंद्र तयार करण्यात आले असून सुमारे ११ हजार ४१२ शासकीय कर्मचारी व निवडणूक अधिकारी यासाठी जबाबदारी पार पाडतील. जिल्ह्यात एकूण १३ लाख २१ हजार २९६ मतदार या निवडणूकीत आपला हक्क बजावणार असून त्यात सहा लाख ३२ हजार १३८ महिला मतदार तर सहा लाख ८९ हजार १४६ पुरुष मतदार मतदान करणार आहेत. मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडला कोरोना रुग्णांचा मृत्यूदरात घट, गुरुवारी ४० कोरोनामुक्त; २५ जण बाधित

मतदानाचा अधिकार ठोसपणे बजवावा 
या मतदानास सकाळी साडेसात वाजता सुरुवात होणार असून सायंकाळी साडेपाचपर्यंत हे मतदान होणार आहे. मतदारांनी मतदान काळात कुठल्याही अमिषाला बळी न पडता आपल्या मतदानाचा अधिकार ठोसपणे बजवावा व कुठे अनुचित प्रकार होत असल्यास प्रशासनास कळवावे, असे आवाहन निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कुठेही अनुचित प्रकार घडल्यास अथवा कुणी घडवून आणल्यास त्याच्यावर कठोर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिला आहे. 
 
नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
 
मतदानासाठी कामगार, कर्मचाऱ्यांना सुटी 

जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे त्या क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सर्व उद्योग व्यवसाय आस्थापना चालकांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजविण्यासाठी सुटी किंवा दोन तासाची सवलत देण्यात यावी. कर्मचाऱ्याच्या वेतनातून वेतन कपात केल्यास ते जिल्ह्यातील जिल्हा कामगार कार्यालयास तक्रार नोंदवू शकतात. खासगी क्षेत्रातील आस्थापनामधील अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी मतदान करावे, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त मोहसिन अब्दुल सय्यद यांनी केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी शुक्रवारी (ता. १५) जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसर तसेच सोमवारी (ता. १८) मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम १४४ लागू करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Polling for 907 gram panchayats in Nanded district today nanded election news