सामाजीक भावनेतून वर्गमित्रांचा असाही सन्मान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

पत्रकार कॉ. प्रदीप नागापूरकर आणि सामाजिक व अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रमुख कार्यकर्ते असलेले प्रा. डॉ. लक्ष्मण उपाख्य नाना शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले

नांदेड : जिल्ह्यातील महत्वाच्या अशा जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकार कॉ. प्रदीप नागापूरकर आणि सामाजिक व अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे प्रमुख कार्यकर्ते असलेले प्रा. डॉ. लक्ष्मण उपाख्य नाना शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे हे दोघे वर्गमित्र असून दोघेही आपापल्या क्षेत्रात सामाजिक भावनेने कार्यरत आहेत. या दोघांचा एकत्रित सत्काराचा दुग्धशर्करा योग निसर्गप्रेमी मित्रांच्या पुढाकाराने संपन्न झाला. 

कॅनाल रोडच्या दुभाजकामध्ये मागील वर्षी एक झाड माझे अभियानाच्या माध्यमातून अनेक झाडे लावण्यात आली होती. आता ही झाडे बहरली असून पंधरा फुटापर्यंत वाढली आहेत. लावलेल्या झाडांपैकी जी झाडे काही कारणाने नष्ट झाली त्यातील एका ठिकाणी वृक्षारोपण करून वाढदिवस आणि नियोजन समितीवरील नियुक्तीचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी गोदावरी बँकेचे सचिव ॲड रवींद्र रगटे, बालाजी टीमकीकर, शुक्ल नर्सरीचे महेश शुक्ला, भारत होकर्णे, पारिवारिक मित्र आणि सदस्य उपस्थित होते. 

हेही वाचा -  वाळू वाहतूक भोवली : तलाठी संघटनेचा लाचखोर जिल्हाध्यक्ष लाचेच्या जाळ्यात

पत्रकारितेतही त्यांचे मोठे योगदान

कॉ. प्रदीप नागापूरकर हे संघटीत आणि असंघटीत कामगारांच्या हक्कासाठी लढणारे लढवय्ये म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर पत्रकारितेतही त्यांचे मोठे योगदान आहे. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व जिल्हा नियोजन समितीत असणे हे अभिनंदनीय असून त्याबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आभार यावेळी अनेकांकडून व्यक्त करण्यात आले. 

डॉ. दाभोळकरांचा पुरोगामी विचारांचा वारसा

तर प्रा. डॉ. नाना शिंदे यांनी अनिस, नागरी कृती समिती या माध्यमातून मोठे काम उभे केले आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचा डॉ. दाभोळकरांचा पुरोगामी विचारांचा वारसा प्रा. शिंदे यांनी जोपासलाच नाही तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंत रुजविण्याचा प्रामाणिक प्रयत्न निरंतन सुरूच ठेवला आहे. माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या नेतृत्वाखाली जडणघडण झालेले नाना शिंदे नागरी कृती समितीच्या माध्यमातून सक्रिय आहेत. प्रत्येक शुक्रवारी नियमितपणे नागरी कृती समितीची जनजागरण फेरी निघत असते. कोरोनाच्या टाळेबंदीमुळेही फेरी सध्या बंद असली तरी त्यांच्यातील सामाजिक कार्यकर्ता शांत बसला नाही. 

येथे क्लिक करा -  हिंगोलीत उभारली जाणार सुंदर शिल्पे

प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकी जोपासण्याचा प्रयत्न 

कोरोना महामारीचे संकट काळात परराज्यातील जे कामगार, मजूर नांदेडमध्ये अडकले होते. त्यांच्यासाठी त्यांनी अविरत मेहनत घेतली. शहरातील लोकमान्य, विश्वलक्ष्मी आणि श्रीकृष्ण मंगल कार्यालयात  प्रशासनाने या कामगारांची राहण्याची आणि जेवण्याची सोय केली होती. या सर्व ठिकाणी नाना शिंदे यांनी नियमित प्रशासनाच्या संपर्कात राहून सायन्स कॉलेजचे सहकारी आणि सामाजिक मित्रांच्या जमेल तशा आर्थिक सहकार्याने रोज नाष्टा, उपलब्ध असणारे फळे सामाजिक बांधीलकीतून देणे सुरू केले. आणि या लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय आणि राज्यातील इतर भागातील लोकांमध्ये प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकी जोपासण्याचा प्रयत्न केला. परराज्यातील अनेक कामगारांना प्रशासनाच्या सहकार्याने त्यांच्या निश्चित स्थळी पोहचविण्यात मोलाची कामगिरी बजावली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Respecting classmates out of social feeling by nanded news