माळाकोळी : माळेगावची यात्रा ही दक्षिण भारतातील प्रसिद्ध यात्रा आहे. या यात्रेच्या नियोजनाचा आपल्याला १९९२ पासूनचा अनुभव आहे. जिल्हा परिषद सभापती असल्यापासून माळेगाव यात्रेचे नियोजन आम्ही करत आलो आहोत. यावर्षी प्रथमच माळेगाव यात्रा प्लास्टिक पिशव्या मुक्त यात्रा करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यासाठी बचत गटाच्या माध्यमातून, कापडी व कागदी पिशव्या कमी दरात उपलब्ध केल्या जाणार आहेत.
तर सुरक्षेच्या दृष्टीने यंदा ‘सीसीटीव्ही’चे नियोजन केले आहे. अशी माहीती शुक्रवारी (ता.२२)रोजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यात्रा नियोजनाच्या बैठकीत दिली. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार सुधाकर श्रृंगारे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार शंकर लाड, कंधारचे तहसीलदार राम बोरगावकर, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, अधीक्षक अभियंता कोरे, पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जिल्हा आरोग्य अधिकारी नीना बोराडे, संदेश चट्टे, यात्रा सचिव मनिषा कापसे, बीडीओ डी.के. आडेराघो, माळाकोळीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय निलपत्रेवार, सरपंच हानमंत धुळगुंडे, बालाजी नंदाने, किरण वट्टमवार, दत्ता वाले आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सहलीचे नियोजन करावे
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल या नवीन अधिकारी असूनही त्यांनी सहा महिन्यांपासून यात्रेची तयारी केली आहे. त्यामुळे आज अनेक बाबतीत नियोजन योग्य झाले आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. माळेगाव यात्रेत अधिकाऱ्यांनी मुक्काम केला तर अजुनही योग्य नियोजन होईल, तसेच शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सहलीचे नियोजन करावे अशा सुचना खासदार चिखलीकर यांनी केल्या.
विलासराव देशमुख यांचे स्मारक होईल
माळेगाव यात्रेच्या विकासात योगदान असलेल्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे स्मारक माळेगाव येथे होईल अशी माहिती यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेसात कोटी रुपये निधी माळेगाव यात्रेच्या विकासासाठी दिला मात्र जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री यांनी खोटी घोषणा केली म्हणूनच खंडोबांनी त्यांना पदावरुन पायउतार केल्याची टीका खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.