esakal | नांदेडमध्ये 'उर्दू घर' सुरू; दिलीपकुमारांचे नाव देण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

nanded

नांदेडमध्ये 'उर्दू घर' सुरू; दिलीपकुमारांचे नाव देण्याची मागणी

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड: उर्दू भाषेने साहित्याच्या क्षेत्रात दिलेले योगदान आणि भाषा म्हणून यात असलेली गोडी ही कोणत्याही धार्मिक चौकटीत बंदिस्त करता येणार नाही. इथल्या लोकांनीही उर्दू भाषेला आपली भाषा मानून शिक्षण-संवेदनेसह प्रगतीचे नवे मार्ग खुले केले आहेत. या उर्दू घरच्या माध्यमातून नव्या सांस्कृतिक पर्वाचा प्रारंभ होत असल्याचा भावना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. १४) व्यक्त केल्या. नांदेडला उर्दू घर इमारतीचे उद्‍घाटन सोहळ्यात ते बोलत होते.

अल्पसंख्याक समाजात बदलत्या शैक्षणिक संदर्भानुसारही विचार करण्याची वेळ आली आहे. यादृष्टीने त्यांच्या स्वयं रोजगाराला चालना देणारे कौशल्य विकासाचे केंद्रही या ठिकाणी कसे आकारात येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगून श्री. चव्हाण यांनी येथील अल्पसंख्याक समाजातील मुलांची संख्या लक्षात घेऊन कौशल्य विकासाचे उपकेंद्र देण्याची मागणी मलिक यांच्याकडे केली. अल्पसंख्यांक विकास मंत्री मलिक म्हणाले की, हिंदी आणि उर्दू भाषेकडे सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणून पाहिले जाते. ही भाषा इथल्या भागाची बोली भाषा आहे. उर्दू भाषा याच मातीत जन्माला आली. ज्या भाषेतून आपण शिकतो त्या भाषेच्या विकासासाठी प्रयत्न करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे. ही जबाबदारी ओळखून उर्दू घरची संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्याचा शासनाचा दृष्टीकोन असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.

हेही वाचा: दुर्दैवी! आजोळी आलेल्या श्रावणीचा पावसाने अंगावर भिंत पडल्याने मृत्यू

दिलीपकुमार यांचे नाव उर्दू घराला द्यावे

उर्दू घरचे भूमिपूजन ज्यांच्या हस्ते झाले ते तत्कालिन मंत्री नसीम खान यांनी नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे हे उर्दू घर असून याला दिलीपकुमार यांचे नाव देणे अधिक समर्पक ठरेल. त्यांचे नाव उर्दू घरला देण्यात यावे, अशी मागणी केली. त्यांच्या मागणीला श्री. मलिक व श्री. चव्हाण यांनी होकार देवून यासाठी एकमताने निर्णय घेवू असे स्पष्ट केले. तसेच स्व. डॉ. शंकरराव चव्हाण यांचे उर्दूतील शिक्षण, उर्दू भाषेची त्यांना असलेली आवड आणि अल्पसंख्याकापोटी त्यांनी जपलेली कटिबध्दता ही सर्वश्रुत आहे. ज्यांनी उर्दू भाषेसाठी योगदान दिले अशा डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीचा दिवस या वास्तूच्या उद्घाटनाला मिळाल्याचा मला विशेष आनंद असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा: Amazon च्या 'प्रोजेक्ट कुइपर'साठी फेसबुकमधील तज्ज्ञांची टीम

अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री नवाब मलिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सहकार, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, माजी मंत्री नसीम खान, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार माधवराव पाटील-जवळगावकर, उपमहापौर मसुद अहेमद खान, अल्पसंख्यांक विकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह विविध मान्यवर, ऊर्दू साहित्यिक आदींची उपस्थिती होती.

loading image