नांदेड जिल्हा परिषदेत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेसंदर्भात कार्यशाळा

अभय कुळकजाईकर
Thursday, 1 October 2020

महिला अर्थिक विकास महामंडळ आणि जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागाच्‍या वतीने बुधवारी (ता. ३०) जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या विषयी कार्यशाळा घेण्‍यात आली. कोरोनामुक्‍त कुटूंब व कोरोनामुक्‍त गाव करण्‍यासाठी सहयोगींनी बचतगटासह गावस्‍तरावरील नागरींकांच्‍या रक्षणासाठी नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवून मोहिम यशस्‍वी करावी असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले आहे.

नांदेड - कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्‍यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम जिल्ह्यात राबविली जात आहे. या मोहिमेत प्रत्‍येक नागरिकांनी सहभागी होऊन स्‍वतःच्‍या आरोग्‍याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. ही मोहिम आरोग्‍याच्‍या चळवळीसाठी महत्‍वाची असून या मोहिमेत सहयोगींनी यांनी रक्षक म्‍हणून काम करावे, असे प्रतिपादन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले.

महिला अर्थिक विकास महामंडळ आणि जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागाच्‍या वतीने बुधवारी (ता. ३०) जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या विषयी कार्यशाळा घेण्‍यात आली. त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, भारतीय वन सेवा विभागाच्‍या मधुमेता, आर्थिक विकास महामंडळाचे जिल्‍हा समन्‍वयक चंदनसिंग राठोड, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. शिवशक्‍ती पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात पावसाळ्यातील चार महिन्यात नऊ जणांचा मृत्यू 

प्रत्‍येकाने प्रयत्‍न करणे आवश्‍यक 
स्‍वत:बरोबरच आपल्‍या कुटुंबाचे संरक्षण ही ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेचा उद्देश आहे. जिल्ह्यात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्‍यात येत आहे. आरोग्‍याची चळवळ होण्‍यासाठी प्रत्‍येकांने प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे. विशेषत: ग्रामीण भागातील बचतगटाचा सहभाग मिळविण्‍यासाठी ही कार्यशाळा घेतली जात आहे. कोरोनामुक्‍त कुटूंब व कोरोनामुक्‍त गाव करण्‍यासाठी सहयोगींनी बचतगटासह गावस्‍तरावरील नागरींकांच्‍या रक्षणासाठी नाविन्‍यपूर्ण उपक्रम राबवून मोहिम यशस्‍वी करावी असे आवाहन मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी केले आहे.

अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन
प्रारंभी अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या माहिमेचे उद्देश सांगतांना म्‍हणाले की, प्रत्‍येक कुटुंबाच्‍या आरोग्‍यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम आहे. या मोहिमेत सहभागी होऊन कोरोनाचा प्रादूर्भाव आपण रोखू शकतो. कोरोनाची लक्षणे दिसताच स्‍वत: पुढे येवून तपासणी करुन घ्‍यावी. गृहभेटीसाठी येणा-या कर्मचा-यांना सहकार्य करुन आपल्‍या आरोग्‍यासाठी सांगण्‍यात आलेल्‍या आरोग्‍य सल्‍ल्‍याचे तंतोतंत पालन करावे, असेही ते म्‍हणाले. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड - खादीवर घोषणांचा पाऊस, सरकार कडून प्रत्यक्षात मदत नाही - ईश्र्वरराव भोसीकर यांची खंत 

अशा करा मोहिम यशस्वी
जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. शिवशक्‍ती पवार यांनी कोरोना व सारी रोगाची लक्षणे, घ्‍यावयाची काळजी, मास्‍क व हॅड सॅनिटायझरचा वापर, सुरक्षित अंतर, गृह विलगीकरण, अ‍लगिकरण, गृहभेटीव्‍दारे साधवयाचा संवाद व तपासणी आदीबाबत मार्गदर्शन केले. महिला अर्थिक विकास महामंडळाचे जिल्‍हा समन्‍वयक यांनी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक केले. या कार्यशाळेला जिल्ह्यातील ३० सहयोगिनीं यांची उपस्थिती होती. या प्रसंगी मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्‍याहस्‍ते सहयोगीनींना माक्‍स व हॅडसॅनिटायझरचे वाटप करण्‍यात आले. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत गावस्‍तरावर राबवलेल्‍या उपक्रमासाठी व्‍हॉटस्अॅप ग्रुप तयार करुन दररोज राबविलेल्‍या उपक्रमाचे फोटो व माहिती देण्‍याच्‍या सूचना यावेळी सीईओ ठाकूर यांनी दिल्‍या.

त्रिसुत्रीचा अवलंब करा
कोरोनाचा प्रभाव अजूनही आहे. मला काय होतंय असे म्‍हणून नागरीकांनी हलगर्जीपणा करु नये. प्रत्‍येकांनी मास्‍क व हॅड सॅनिटायझरचा वापर तसेच सा‍माजिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा प्रत्‍येक नागरीकांनी अवलंब करणे आवश्‍यक आहे.
- वर्षा ठाकूर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, जिल्‍हा परिषद, नांदेड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workshop on 'My Family, My Responsibility' campaign in Nanded Zilla Parishad, Nanded news