तरुणांच्या थरारक कृ्त्याची पंचक्रोशीत चर्चा ; १० फूट मगर नेली चक्क खांद्यावरुन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 January 2021

२५ जानेवारीला रात्री झालेल्या या घटनेची जिल्हाभर चर्चा आहे.

सांगली : मगर दिसली की ‘पळा, पळा’ म्हणायची वेळ येते. मगरीचा धोका नेहमीचा असल्याने तिला जेरबंद करावे आणि दूर कुठेतरी सोडावे, असा विचारही कुणी केला नसता. ते धाडस साटपेवाडी (ता. वाळवा) येथील तरुणांनी केले आहे. मगरीच्या डोळ्यावर पोते टाकून, तिचे तोंड बांधून मगरीला चक्क खांद्यावर उचलून घेत तिला वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले. २५ जानेवारीला रात्री झालेल्या या घटनेची जिल्हाभर चर्चा आहे.

साटपेवाडी आणि तुपारीतील तरुणांच्या धाडसाचे सगळीकडे कौतुक होत आहे. उपसरपंच अशोक साटपे यांनी आँखो देखा हाल ‘सकाळ’ला सांगितले. ते म्हणाले, 'तुपारीत नदीवर बंधारा आहे. त्या बंधाऱ्याच्या बाजूला मगर आली होती. एक युवक मेडिकल दुकान बंद करून गावात येत होता. त्याला पुलावर मगर दिसली. त्याने खूपवेळ हॉर्न वाजवला, मात्र ती हालेना. ना ती पुढे गेली, ना मागे हटली. त्या तरुणाने गावात मोबाईलवरून ही माहिती दिली.

हेही वाचा -  आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रांताधिकाऱ्यांना धारेवर धरले 

तुपारी आणि साटपेवाडीतील तरुण बंधाऱ्याकडे धावले. त्यात दंगा सुरु झाला. मगर पुलाखाली निघाली. तोवर युवकांनी तिला पकडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय धाडसी होता, मात्र तरुणांनी हुशारीने काम केले. फास तयार केला, मगरीच्या डोळ्यावर पोते टाकले. मगरीला दिसायचे बंद झाले की तिची ताकद आपोआप गळून पडते. तसेच झाले. तरुणांनी शिताफीने तिचे तोंड बांधले. उचलून आणून वन विभागाला फोन केला. त्यांनी मगर ताब्यात घेतली. पन्नास ते साठ तरुणांनी हे कामगिरी केली. तुपारीतील तरुणांनीही सहकार्य केले.'

२५ जानेवारीला रात्री दहाच्या सुमारास प्रकार घडला. मगरीचा या भागात वावर वाढला होता. ग्रामस्थांत भीतीचे वातावरण होते. मगर पुन्हा पात्रात गेली तर नदीकाठी फिरणे अवघड झाले असते. सतत मृत्यूच्या दाढेत रहावे लागेल, याची भिती लोकांना होती. मगरीला जेरबंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आठ ते दहा फूट लांबीची मगर पकडण्यात यश आले. ही मगर वन विभागाच्या ताब्यात देण्याच्या हालचाली करण्यात आली. रात्रीची वेळ असल्याने पकडलेली मगर जास्त काळ तशीच ठेवणे धोकादायक ठरले असते. वन विभागाचे लोकही लवकर आले. ग्रामस्थांनी ही मगर थेट खांद्यावर घेतली आणि वन विभागाच्या ताब्यात दिली.

हेही वाचा - दलाल, बुकिंना संरक्षण कुणाचे? दहा महिन्यांत ३८५ छापे 

पूर्वीचा अनुभव

या भागात पाच वर्षांपूवी मगरीचे एक पिलू गावकऱ्यांनी पकडले होते. त्याचा अनुभव तरुणांना होता. काही वाहिन्यांवर लोकांनी मगर कशी पकडली जाते, हे पाहिले होते. त्याचा फायदा तरुणांना झाला, असे ग्रामस्थांनी सांगितले.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 feet crocodile take youth in sangli siddewadi and take over to forest department