ऍड. पानसरे खुनाच्या तपासासाठी  राज्यात 47 एसआयटी कार्यरत 

47 SITs working in the state to investigate Pansare murder
47 SITs working in the state to investigate Pansare murder

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते ऍड. गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या तपासासाठी राज्यात 47 एसआयटी काम करीत आहेत. प्रत्येक आठवड्याला तपासाचा आढावा घेतला जाईल. सरकार याबाबत गंभीर आहे, असे स्पष्ट मत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज येथे स्पष्ट केले. डाव्या आघाडीच्या शिष्टमंडळाने आज शासकीय विश्रामगृहावर त्यांची बैठक घेतली. यावेळी शिष्टमंडळाने मोका लावण्यासह अन्य मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी मंत्री पाटील यांनी हे आश्‍वासन दिले. 

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाला आज पाच वर्षे पूर्ण झाली. या पार्श्‍वभूमीवर शिष्टमंडळाने मंत्री पाटील यांची भेट घेतली. तपासातील मुख्य आरोपी अद्याप अटक झालेले नाहीत. तपास समाधानकारक नाही, आरोपींना मोका लावावा, यासह अन्य मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने त्यांना दिले. 

निवेदन स्वीकारल्यावर मंत्री पाटील यांनी तपासात सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. सध्या तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असल्याचे सांगून संबंधित आरोपीवर लावलेली कलमे गंभीर स्वरूपाची आहेत. यातून पळवाट निघणार नाही, याची काळजी घेतली जाईल. तपासात हत्येसाठी वापरलेली पिस्तूल आणि मोटारसायकल जप्त करण्याच्या दृष्टीने तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारकडून तपासात कोणतीही हयगय केली जाणार नाही.'' 
मंत्र्यांनी सांगितले, की आरोपींना मोका लावण्याची मागणी होत असली तरीही याबाबत कायदेशीर बाबी तपासणे आवश्‍यक आहे. सरकारी वकिलांशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला जाईल. आरोपींची छायाचित्रे यापूर्वी प्रसिद्ध केली आहेत, ती पुन्हा पुन्हा प्रसिद्ध केली जातील. ज्यांना माहिती असेल त्यांनी कोणाचीही भिडभाड न बाळगता माहिती द्यावी, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले. यापूर्वीही भाजप सरकारने आरोपींची माहिती देण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे. स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. त्यातून अपेक्षित माहिती मिळाली नसल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. 

शिष्टमंडळात सतीशचंद्र कांबळे, चंद्रकांत यादव यांच्यासह इतर पानसरेप्रेमी आणि डाव्या आघाडीतील कार्यकर्त्यांचा समावेश होता. 

निवेदनातील मागण्या 
ऍड. पानसरे खुनात अटक झालेल्यांचा जामीन रद्द करावा, सनातन संस्थेवर बंदी घालावी, फरारी आरोपी विनय पवार आणि सारंग आकोळकर व सूत्रधाराला अटक करावी, त्यासाठी आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे हत्येतील आरोपींना अतिरेकी व दहशतवादी जाहीर करा, खुनातील मास्टर माईंडला अटक करावी, अशा मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com