
अग्निशमन यंत्रणेने शहरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्येही नियमांचे पालन होते की नाही, याची पडताळणी केली. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई या मोहिमेत सहभागी होते.
कोल्हापूर : महापालिकेने कोरोनाच्या दुसऱ्या साथीचा धोका उद्भवू नये, म्हणून आजपासून कारवाईला सुरवात केली. नियमांचे पालन करण्याच्या अटीवर मंगल कार्यालयांना परवानगी दिली आहे; पण त्याचे पालन होत नसल्याने आज अग्निशमन विभाग पथकाने शहरातील २७ मंगल कार्यालयांची तपासणी केली. परवानगी घेतली नाही, सोशल डिस्टन्सचे पालन केले नाही, मास्कचा वापर नाही, अशी कार्यालये, लग्न समारंभ आयोजकांवर कारवाई करत तीस हजार पाचशे रुपयांचा दंड वसूल केला.
हेही वाचा-*नववधूच बाधित झाल्याचे समजताच तिच्या तीव्र संपर्कात आलेले अनेक जण गायब*
फुलेवाडी परिसर, आपटेनगर, कळंबा, सानेगुरुजी वसाहत, क्रशर चौक, नाळे कॉलनी, बेलबाग, कसबा बावडा परिसर, ताराबाई पार्क परिसर, कावळा नाका, रेल्वे गुड्स परिसर येथील विविध मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, रणजित भिसे आदींसह कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला. सुटी दिवशीही पथके कारवाई करत होती.
हॉटेल्सचीही तपासणी
अग्निशमन यंत्रणेने शहरातील वेगवेगळ्या हॉटेलमध्येही नियमांचे पालन होते की नाही, याची पडताळणी केली. अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई या मोहिमेत सहभागी होते. ताराराणी चौक (कावळा नाका) ते मुक्त सैनिक वसाहत या टापूतील हॉटेलची पाहणी केली. यापैकी हॉटेल कवासा हिल, कोल्हापूर तडका या हॉटेलला एक हजार रुपयांचा दंड केला. प्रशासनाने हॉटेल परख, हॉटेल कौलारू, हॉटेल कसावा हिल, हॉटेल नैवेद्य येथे तपासण्या केल्या.
हेही वाचा- ग्रामपंचायतीचा कर भरा अन् सोने जिंका
वशिलेबाजी नको, नियम पाळा
समारंभाचे आयोजन केले आहे, त्यांनाही आता कारवाईची भीती वाटू लागली आहे. कारवाई झाली तर नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे वशिलेबाजीचाही प्रयत्न होत आहे; पंरतु नागरिकांनी वशिलेबाजी न करता नियमांचे पालन करुनच समारंभ साजरे करावेत. सुरक्षित अंतर आणि मास्कचा वापर आवश्यकच आहे. कारवाई झाल्यावर वशिले लावण्याऐवजी नियमांचे पालन केले तर कारवाईची वेळच येणार नाही, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
मास्कच्या कारवाईची तीव्रता वाढणार
महापालिकेने तीन ते चार दिवसांपासून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई पुन्हा सुरू केली आहे. सोमवारपासून कारवाईची तीव्रता वाढविण्यात येणार आहे. प्रत्येक प्रमुख रस्त्यावर महापालिकेच्या विविध विभागांची पथके थांबून मास्क नसणाऱ्यांवर कारवाई करतील. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
संपादन- अर्चना बनगे