भारताचे पहिले ऑलम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांना पद्मभूष देण्याच्या मागणीसाठी ट्विटरवर मोहीम 

सुयोग घाटगे 
Tuesday, 15 September 2020

आमदार ऋतुराज पाटील यांनी ट्वीटरवर #PadmaForKhashabaJadhav या हॅशटॅगने मोहीम उघडली असून त्याला तरुणांचा प्रतिसाद लाभत आहे.

कोल्हापूर : भारताचे पहिले ऑलम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी ट्विटरवरून तरुणाईला साद घातली आहे. त्यांच्या या हाकेला सध्या जोरदार प्रतिसाद मिळत असून #PadmaForKhashabaJadhav हा हॅशटॅग सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

१९५२ च्या ऑलिंपिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये स्वतंत्र भारतासाठी पहिले वैयक्तिक कांस्यपदक जिंकणारे खाशाबा जाधव हे पहिले खेळाडू होते. असे असूनही त्यांचा यथोचित सन्मान झाला नसल्याची भावना सर्वच क्रीडाप्रेमींमध्ये आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी ट्वीटरवर #PadmaForKhashabaJadhav या हॅशटॅगने मोहीम उघडली असून त्याला तरुणांचा प्रतिसाद लाभत आहे. अनेकांनी ऋतुराज पाटील यांचे हे ट्विट रिट्विट केले असून शेकडो लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आहे. 

आमदार पाटील यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे कि, 
सन्मान खाशाबांचा..कोल्हापूरच्या कुस्तीपरंपरेचा !!
#PadmaForKhashabaJadhav कुस्ती म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणजे कुस्ती! या परंपरेवर जागतिक पातळीवर शिक्कामोर्तब केले ते ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव यांनी. खाशाबांनी कुस्तीतून #ब्रँड_कोल्हापूर जगात पोहोचवला. खाशाबांचे नाव आजही लोकांच्या मनामनात आहे. पण या कोल्हापुरी कर्तृत्वाचा सरकारी पातळीवर योग्य सन्मान झालेला नाही. त्यामुळेच, त्यांचा यावर्षी मरणोत्तर "पद्मभूषण"  पुरस्काराने सन्मान व्हावा अशी संपूर्ण कोल्हापूरकर आणि कुस्तीप्रेमींची भावना आहे. महाराष्ट्र सरकार आज केंद्राकडे नावे पाठवणार आहे. समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने माझी राज्य व केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी खाशाबा जाधव यांचा यथोचित गौरव करावा. 

हे पण वाचा -  इंग्लंडमधील वृत्तपत्रांनी दखल घेतलेले कोल्हापुरचे माजी कसोटीपटू एस. आर. पाटील यांचे निधन 

या ट्विटमध्ये ऋतुराज पाटील यांनी पद्म पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री अदिती तटकरे यांना देखील टॅग केले आहे.

 खाशाबांसाठी आपणही सोशल मीडियावर PadmaForKhashabaJadhav हा टॅग वापरून आपल्या भावना ट्विट करूयात. चला, सर्वजण मिळून #ब्रँड_कोल्हापूर मोठा करूया..

- आमदार ऋतुराज पाटील    

हे पण वाचाकोल्हापुरातील मराठा आंदोलन भरवणार शासनाला धडकी

 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: camping on twitter PadmaForKhashabaJadhav