सावधान ; संतुलीत आहाराशिवाय व्यायाम करत असाल तर हे वाचा 

contented exercise without a balanced diet
contented exercise without a balanced diet

कोल्हापूर - शरीराचे वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाऊन घाम गाळणाऱ्या महिलांचा आकडा वाढत आहे. महिन्याला पाच ते दहा किलो वजन कमी करण्यात यश येत आहे. मात्र संतुलित आहार न घेतल्यामुळे त्याचे दुष्परिणाम महिलांना सोसावे लागत असल्याचे चित्र आहे. चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे, रक्तातील साखर कमी होणे, त्वचा व केस कोरडे पडणे असे प्रकार होत असल्याचे पुढे आले आहे. 

बदलत्या जीवनशैलीत आरोग्याबाबत महिला अधिक जागृत झाल्या असून त्यांच्यामध्ये "स्लिम' दिसण्याची क्रेझ निर्माण झाली आहे. लग्नानंतर शरीराचा वाढणाऱ्या आकाराची भिती तसेच चारचौघात फिट दिसण्यासाठी महिला अधिक दक्ष असतात. त्यामुळे फिट राहण्यासाठी व्यायामाची आवश्‍यकतेचा एक माहौल सध्या तयार झाला आहे. 

रोगांपासून दूर राहण्यासाठी व्यायाम आवश्‍यकच, अशी एक मानसिकता त्यांच्यामध्ये दिसते. परिणामी, फिजिओथेरपिस्ट व आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय जिममध्ये महिला व्यायाम करतात. दिवसातील साधारण एक ते दोन तास जिममध्ये वेटलॉस, वेटगन, बॉडीबिल्डींग, जनरल फिटनेस, स्टीम बाथ अशा व्यायामाच्या वर्गवारीत व्यायाम करतात. त्यासोबतच दिवसातून फक्त सलाड खाणे, ज्युस पिणे, पाणी पिणे असा मोजकाच आहार घेतात. त्यामुळे चक्कर येणे, अशक्तपणा वाटणे, रक्तातील साखर कमी होणे, त्वचा व केस कोरडे पडणे, असे दुष्परिणाम जाणवू लागतात. हे टाळण्यासाठी व्यायामासोबतच योग्य व संतुलित आहार घेण्याची आवश्‍यकता असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. 

नोकरदार महिलांचा वाढता कल 
आजच्या महागाईच्या काळात महिला नोकरी करताना दिसतात. घर, नोकरी सांभाळताना महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यातच कार्यालयात बसून काम असल्याने पाठीच्या व गुडघ्याच्या समस्या उद्‌भवतात. त्यामुळे आपले आरोग्य सदृढ राहण्यासाठी महिलांचा जिमकडे कल वाढला आहे. 
 
वजन कमी करायचे म्हणून जिमला जाऊन व्यायाम करणाऱ्या महिला योग्य व संतुलित आहार घेत नाहीत. वजन कमी करण्यासाठी योग्य व्यायामासोबातच संतुलित आहारही घेणे गरजेचे आहे. फक्‍त फळांचा रस, भाज्यांचे सुप घेतल्याने शरीराला आवश्‍यक असणारी जीवनसत्वे मिळत नाहीत. याचा परिणाम आरोग्यावर होतो. 
डॉ. निकीता चौगुले, आहारतज्ज्ञ 

सदृढ राहण्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला 
- देहयष्टीनुसार संतुलित आहार घेणे गरजेचे 
- दर तीन ते चार तासांनी थोडे थोडे खाणे 
- मधल्या वेळेत हलका आहार घेणे 
- फास्ट फुड, जंक फुड टाळावे 
- सकस व प्रोटिनयुक्त आहार घ्यावा 
- जेवणात सिझननुसार हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करावा 
- दुधाचे पदार्थ घ्यावेत 
- दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com