लॉकडाऊनने हाताचे काम पळविले. मात्र, याने दिला अनेकांच्या संसाराला हातभार ...

Contribute to the artisans by selling vegetables
Contribute to the artisans by selling vegetables

जयसिंगपूर (कोल्हापूर) :  एरव्ही हातात वळंबा आणि थापी घेऊन भिंतीला आकार देणाऱ्या, हातात ब्रश घेऊन भिंतीला रंगाने सजविणाऱ्या आणि हातोडा, पाना, हातोडा घेऊन प्लम्बिंगची कामे करणाऱ्या हातांवर तराजू घेऊन भाजीपाला विक्री करण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊननंतर हाताला काम नसल्याने गाडा घेऊन गल्लोगल्ली फिरून भाजीपाला विकण्याची वेळ या कारागीरांवर येऊन ठेपली आहे. लॉकडाऊनला महिना लोटला. रिकाम्या हातांना काम नसल्याने हातातोंडाचा मेळ साधण्यासाठी भाजीपाला विक्रीतून संसाराला हातभार लावण्याची धडपड कारागीरांची सुरु आहे. 

  जयसिंगपूर सुशिक्षित आणि श्रीमंत शहर. बांधकामाची कामे वर्षभर सुरु असतात. गेल्या पंधरा वर्षात शहरासह उपनगरात टोलेजंग इमारतींवरुन शहराची श्रीमंती लक्षात येते. यामुळे कष्टाळू कारागीर सुखाची रोजीरोटी खाऊन समाधानान जगत होता. मात्र, कोरोना त्यांच्यासाठी सत्वपरीक्षा घेणारा ठरला. लॉकडाऊनच्या काळात शहरातील सर्वच कामे ठप्प आहेत. नोटाबंदीनंतर मंदी आली. यातूनही सावरत शहरातील बांधकाम उद्योग सुरु होता. मात्र, लॉकडाऊनच्या काळात शंभर टक्के बांधकामे बंद राहिल्याने जमापुंजी संपल्याने आता करायचे काय हा प्रश्न पुढे आला. 

गवंडी, पेंटर, प्लंबरांच्या हातात तराजू ​

यातूनच भाजीपाला विक्रीतून संसाराला हातभार लावण्याची शक्कल त्यांनी लढविली. आज शहरातील भागाभागात भाजीपाला विक्रेत्यांची आरोळी ऐकण्यास मिळत आहे. ज्या भागात अपार्टमेंट बांधल्या त्याच भागात आता भाजीपाला घेऊन विक्री करण्याची वेळ या कारागीरांवर आली आहे. सौद्यातून भाजीपाला खरेदी करायचा आणि दिवसभर तो शहराच्या भागाभागात जावून विकायचा असा दिनक्रम या कारागीरांचा सुरु आहे. यातून चार पैसेही मिळत असल्याने रिकाम्या हातांना भाजीपाल्यानेच साथ दिली आहे. 

भाजीपाला विक्रीतून कारागीरांच्या संसाराला हातभार

  लॉकडाऊनच्या काळात नगरपालिकेने बाजाराची व्याख्याच बदलून टाकली. गर्दी टाळण्यासाठी भाजीपाला विक्रेत्यांनी फिरून भाजीपाला विक्री करण्याचे आदेश दिल्याने अनेकांना भाजीपाला विक्रीतून संसाराचा गाडा हातण्याची संधीच मिळवून दिली आहे. एरव्ही कधी भाजीपाला विक्रीचा अनुभव नसणारे कारागीर आता गेल्या पंधरा दिवसांपासून फिरुन भाजीपाला विक्री करत अनुभव गाठीशी बांधताना दिसत आहेत. एकूणच काय तर लॉकडाऊनने हाताचे काम पळविले. मात्र, भाजीपाल्याने हाताला काम देऊन संसार सावरले अशी म्हणण्याची वेळ गवंडी, पेंटर आणि प्लंबर यांच्यावर आली आहे. 

.... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com