संचारबंतीत वाहतूक ; कारखान्याच्या व्यवस्थापकासह सहा जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

बेकायदेशिर प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी चिपरी (ता. शिरोळ) येथील कारखान्याच्या मुख्य व्यवस्थापकासह सहा जणांविरोधात जयसिंगपूर पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल केला. 

जयसिंगपूर (कोल्हापूर)  - संचारबंदीच्या काळात बेकायदेशिर प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी चिपरी (ता. शिरोळ) येथील कारखान्याच्या मुख्य व्यवस्थापकासह सहा जणांविरोधात जयसिंगपूर पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल केला. 

याप्रकरणी कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक सुनील शहा यांच्यासह दत्ता लिंबाजी कसबे (रा. लुखेगाव ता. माजलगाव, जि. बीड), वाहतूक कंत्राटदार रावसाब देऊ कागे (रा. नेज ता. चिकोडी, जि. बेळगाव), फिल्डमन कुमार  कुमटाळे (रा. आर. के. पार्कजवळ अब्दुललाट ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), वाहन चालक मालक विकास सुकुमार बरगाले (बरगाले मळा अब्दुललाट), अमोल रायगोंडा पाटील (चौगुले गल्ली अब्दुललाट) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे पण वाचा - ब्रेकिंग : इस्लामपुरातील आणखी एका महिलेस कोरोना; रूग्णांची संख्या 22 वर

रविवारी रात्री साडेअकरा वाजता कोल्हापूर-सांगली महामार्गावरील अंकली टोल नाक्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिस नाईक बाळासाहेब चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक खेडकर तपास करत आहेत.

  हे पण वाचा -  ब्रेकिंग - कोल्हापुरात कोरोनाचा तिसरा रूग्ण सापडला

याबाबत सुनील शहा म्हणाले, २३ मार्चला कारखाना बंद करण्यात आला आहे. प्रवासी वाहतूकीशी कारखान्याचा कोणताही संबंध नाही. कारखान्याच्या प्रशासनाने पत्र दिले नाही. दिलेले पत्र साध्या कागदावर असून यावर प्रशासनातील कोणाची सही अथवा शिक्का नाही. प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता वाहतूक करण्यात आली आहे. 

लॉकडाऊनच्या काळात कामगारांची व्यवस्था कंत्राटदाराने केली होती. तरीही परस्पर ही वाहतूक करण्यात आली आहे. गुन्ह्यात प्रशासनाचे म्हणणे लक्षात न घेताच आपल्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कारखान्याचा वाहन धारकाशी करार झाला आहे, तोडणी कामगारांशी नाही. प्रशासनाचे कोणतेही पत्र नाही, कामगारांचा संबंध नसतानाही यात प्रशासनाला गोवण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime filed against sugarcane factory manager