मनाला चटका लावणारी घटना ; एका आठवड्यात तीन सख्ख्या भावांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

कुटुंबातील तिघांचा कोरोनाने बळी घेतला तरी आरोग्य विभागाने गांभीर्य दाखविले नाही

कुरुंदवाड (कोल्हापूर) - शिरढोण (ता. शिरोळ) येथील तीन सख्ख्या भावांचा आठवडाभरात कोरोनाने बळी घेतला. सुरुवातील एका भावाला खोकला व ताप आल्याने आयजीएममध्ये दाखल केले. तेथे ते कोरोना पॉझिटिव्ह आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आठवडाभरातच मधल्या भावाला त्रास जाणवू लागला. उपचारासाठी नेत असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुर्दैव म्हणजे दुसऱ्याच दिवशी लहान भावाचा मिरज येथे खासगी दवाखान्यात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. तिघांनाही कोरोनाची बाधा झाली होती. 

दरम्यान, कुटुंबातील तिघांचा कोरोनाने बळी घेतला तरी आरोग्य विभागाने गांभीर्य दाखविले नाही. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विश्वास बालिघाटे यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. तहसीलदार अपर्णा मोरे यांनी चौधरी कुटुंबीयांची भेट घेतली आरोग्य विभागाला उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. चौधरी कुटुंबातील व संपर्कातील २६ जणांचे स्वॅब घेतले.

जिल्ह्यात नवे ५६ कोरोनाबाधित
 जिल्ह्यात आज एकूण ५६ कोरोना बाधित आढळले. दिवसभरात एकूण १३० जण कोरोनामुक्त झाले. शहर आणि परिसरात सर्वाधिक सतरा रुग्ण सापडले असून भुदरगड, चंदगड, गगनबावडा, पन्हाळा तालुक्‍यात प्रत्येकी एक बाधित आढळला. करवीर तालुक्‍यात आठ, शाहूवाडीत सहा, शिरोळमध्ये पाच, कागलमध्ये तीन, हातकणंगलेत दोन, नगरपालिका क्षेत्रात सहा तर इतर जिल्ह्यातील पाच बाधितांचा नव्या बाधित रुग्णांमध्ये समावेश आहे.

हे पण वाचातुम्ही कधी पिलाय का? ७५ हजार रुपये किलोचा ‘व्हाईट’ चहा

इचलकरंजीत दोन रुग्ण

 शहरात आज दोन रुग्णांची भर पडली. पंचवटी चित्रमंदिर परिसरातील महिला तर लांडे हॉस्पिटल परिसरातील वृद्धाला संसर्ग झाला आहे. सध्या शहरात ७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, पालिकेने सुरू केलेल्या चारही कोरोना कोविड सेंटरमध्ये एकही रुग्ण दाखल नाही. सध्या आयजीएम रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

हे पण वाचारस्त्यावर निर्जन ठिकाणी तरूणीचा विनयभंग ; पीडितेची आत्महत्या

 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of three brothers in kolhapur kurundwad