राईची झाली रूई आणि लोकांना झाली पळता भुई.....

संजय खुळ
बुधवार, 20 मे 2020

जिल्ह्यातील राई आणि रूई या दोन गावातील इंग्रजीमधील स्पेलिंग मिस्टेकने घातला गोंधळ ...

इचलकरंजी : जिल्हा प्रशासनाने हातकणंगले तालुक्यातील रूई या गावात दोन रूग्ण असल्याचे जाहीर केल्यानंतर त्याचा मोठा मनस्ताप आज ग्रामस्थांना सहन करावा लागला. जिल्ह्यातील राई आणि रूई या दोन गावातील इंग्रजीमधील स्पेलिंग मिस्टेकने हा गोंधळ झाला. आज दुपारपर्यंत गावासह अन्य ठिकाणीही याबाबत मोठी संभ्रमावस्था होती. अखेर तालुका प्रशासनाने तालुक्यात या गावामध्ये रूग्ण नसल्याचे सांगितल्यानंतर या विषयाची चर्चा थांबली.

कोल्हापूर येथे पाठविण्यात आलेले स्वॅब तपासणीचा अहवाल काल आला होता. यातील 39 गावांची नावे जिल्हा प्रशासनाने जाहीर केली होती. त्यात हातकणंगले तालुक्यातील रूई या गावातील 24 वर्षाची महिला व 26 वर्षाचा पुरूष पॉझिटिव्ह असल्याचे नमूद करण्यात आले होते. शासकीय स्तरावरून जाहीर झालेल्या या गावांची यादी काल रात्रीच सोशल मिडीयावरून फिरू लागली. त्यामुळे रात्रभर रूई गाव तणावाखाली राहिले. मध्यरात्रीनंतरच काही लोकप्रतिनिधींनी तालुका प्रशासनाकडे चौकशी केली असता त्यांनी तालुक्यात या गावाबाबत कोणताही आदेश आला नसल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा- ब्रेकिंग - कोल्हापुरात कोरोनाचे दीड शतक पार, आणखी  19 जण पाॅझिटिव्ह

तरीही आज सकाळी गावातील लोकप्रतिनिधींनी तालुक्याचे तहसीलदार व गटविकास अधिकारी कार्यालयात जावून याबाबतची खातरजमा केली. अखेर दुपारनंतर गावातीलच लोकप्रतिनिधींनी गावामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण नसल्याचे जाहीर केले. आणि त्यानंतर ग्रामस्थांनी सुस्कारा सोडला.दरम्यान आज अनेक प्रसारमाध्यमांमध्ये या गावातील 2 रूग्ण असल्याचे जाहीर झाले आहे. त्याचा मोठा फटका अनेकांना बसला. चक्क या गावातील अनेकांना त्यांच्या अस्थापनावर कामावरच घेतले नसल्याची माहिती युवकांनी ग्रामसमिती सदस्यांना दिली. तसेच या गावाकडे जाण्यासाठीही अनेकजण धास्ती घेतली. गावातील कुटुंबियांना त्यांच्या नातेवाईकांकडून येणारे सातत्याने फोनमुळे मानसिक त्रास सहन करावा लागला.

हेही वाचा- समन्वयच नसल्याने शिवसेना सरकार अपयशी : प्रवीण दरेकर

आम्ही तालुका प्रशासनाकडे याबाबतची अधिकृत माहिती घेतली. मात्र गावातील नावात असलेला साध्यर्म आणि झालेली स्पेलिंग मिस्टेक यामुळे गावचे नाव कोरोना पॉझिटिव्हच्या यादीत आले. याबाबत प्रशासनाने गावाला क्लिनचीट दिली आहे.
सौ. कोमल सुनिल साठे
सरपंच व अध्यक्ष, ग्राम दक्षता समिती, रूई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: district administration corona wrong information in rui village