Video - डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्ल्याला कोल्हापूरच्या डाॅक्टरांचे प्रत्युत्तर.....

अमोल सावंत
शनिवार, 28 मार्च 2020

अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर इपीडिमॉलॉजी डायरेक्‍टर डॉ. फॉस्सी यांनी तत्काळ खुलासा केला की, ही गोळी घेतली तर कोरोना पूर्ण बरे होईल असे नाही.

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हायड्रोक्‍सोक्‍लोरोक्वीन 400 एमजी (एचसीक्‍युएस) ही गोळी कोरोना विषाणूवर प्रभावी आहे. गुणकारी आहे, असे सोशल नेटवर्किंग साईटस्‌वरील पोस्टमध्ये वक्तव्य केले होते; मात्र तज्ज्ञ डॉक्‍टर म्हणतात, की कोणीही उठावे अन्‌ ही गोळी घ्यावी. मग कोरोना बरा होतो, अशा भ्रमात कोणी राहू नये. ही गोळी डॉक्‍टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणीही घेऊ नये.

अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितल्यानंतर इपीडिमॉलॉजी डायरेक्‍टर डॉ. फॉस्सी यांनी तत्काळ खुलासा केला की, ही गोळी घेतली तर कोरोना पूर्ण बरे होईल असे नाही. हा काही "मिरॅकल (चमत्कारीक) ड्रग नाही. यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सुचनेशिवाय ही गोळी घेऊ नये. यावर अजून संशोधन सुरु आहे. मात्र एक झाले. प्रत्येक मेडिकल दुकानामध्ये ही गोळी आहे का, म्हणून अनेकजण विचारणा करत आहे. यामुळे या गोळीचा तुटवडा सुरु आहे. 

हेही वाचा- माध्यान्ह भोजनचे धान्य मुलांना वाटा -

वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या सुचनेशिवाय ही गोळी घेऊ नये. ​

हायड्रोक्‍सीक्‍लोरोक्वीन सल्फेट हे डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारी आदीमध्ये भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) निर्गमित केलेल्या सूचनेनुसार वापरले जाते. हे औषध मलेरिया व्यतिरिक्त ल्युपस, ऱ्हिमोटॉईड अर्थायट्रिस, ज्युवेनाईल अर्थायट्रिस आदी आजारामध्ये वापरले जाते. हे औषध सरसकट कोणतीही अर्धवट माहितीच्या आधारे घेणे अतिशय धोकादायक ठरू शकते. अगदी आपली जीवावर ही बेतू शकते, असे डॉक्‍टर्स म्हणतात. अशा काही केसेसदेखील गेल्या काही दिवसात निदर्शनास आल्या आहेत. डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय अनेकांनी या गोळ्या घेतलेल्या आहेत. विशेषत: कोल्हापूरमधील मेडिकल दुकानामध्ये या गोळीचा तुटवडा गेल्या काही दिवसांपासून जाणवत आहे. 

हेही वाचा- आयुक्त म्हणतात...ऍप वरून जीवनावश्‍यक वस्तू मिळवा -

भारतात आणि अमेरिकेत दोन मृत्यू ​

याबाबत कसबा बावड्यातील ओम साई ऑन्को सर्जरी सेंटरचे डॉ. प्रशांत लाड म्हणाले, ""सर्वसामान्य नागरिकांना अशा टॅब्लेटस्‌, ड्रग्ज, अन्य औषधांशी संबंधित माहिती ही सोशल नेटवर्किंग साईटस्‌वरुन देऊ नये. ही गोळी घाऊन भारतात अन्‌ अमेरिकेत दोन मृत्यूही झाले आहेत. मलेरिया, संधीवातासाठी, रोगप्रतिकारक शक्ती "नॉर्मल' करण्यासाठी ही गोळी वापरली जाते. अनेकदा काहींमध्ये ही गोळी खाल्ली तर अतिरिक्त रोगप्रतिकारक शक्ती खूप वाढते. अशा पद्धतीने रोगप्रतिकारशक्ती ही खूप वाढणे सुद्धा धोकादायक असते.

हेही वाचा- अबब : 25 लाख मिटर कापड लागलय कुजायला....

कोरोनाचे संदर्भात नियम पाळा

परिणामी, हृदय, किडनी, अन्य संवेदनशील अवयव यांना धोका होऊ शकतो. यासाठी डॉक्‍टरांनी सांगितल्याशिवाय ही गोळी कोणी ही घेऊ नये. अलिकडे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काही रुग्णालयातील कर्मचारी ही रुग्णांच्या संपर्कात येत आहेत. त्यावेळी त्यांना डॉक्‍टर हे प्रोफीलायटीक यूज (आजार होण्यापूर्वी काळजी घेणे) सांगत आहेत; पण ते घातक आहे. म्हणून अशा गोळ्यांची मागणी वाढलेली दिसत आहे; पण ही डॉक्‍टरांच्या परवानगीशिवाय कोणी घेऊ नये. यासाठी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मास्क वापरा. सॅनिटायझरचा वापर करावा. विशिष्ठ अंतर ठेवा. घरी थांबा. कोरोनाचे जे काही नियम आहेत. ते कसोसीने पाळा. ही गोळी खाल्ल्याने कोरोना बरा होईल, हा गैरसमज करुन घेऊ नका. या गोळीच्या अतिरिक्त डोसेसमुळे हृदयाचे ठोके कमी होऊ शकतात. हृदयविकार ही येऊ शकतो. तुम्ही जिथे आहात. तिथला एसी गरज असेल तर लावा; अन्यथा बंद करा.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors from Kolhapur respond to Donald Trump kolhapur marathi news